चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे हे पुढेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी महायज्ञाचे आयोजन केले आहे.
सांगली : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. या प्रमुख दोन युतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत रस्सीखेच सुरु होती. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी ठाकरे गटाच्या नेत्यांची इच्छा आहे. तर लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर कॉंग्रेस पक्षच मोठा असल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी कॉंग्रेस पक्षाकडून मागणी केली जात आहे. आता मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी निवडणूक लढणार आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासाठी एका नेत्याने साकडं घातला आहे.
राज्यामध्ये बंडखोरीचं राजकारण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना अचानकपणे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागेल. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना पाहायचे आहे. यासाठी आता साकडं, नवस आणि महायज्ञ घातले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी महायज्ञाचा घाट घातला आहे. 101 पुजाऱ्यांच्या हस्ते हा महायज्ञ केला जाणार आहे. त्याचबरोबर बैलगाडा शर्यतीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे सत्तेमध्ये यावेत यासाठी हे प्रयत्न सुरु आहे.
विजेत्यांना मिळणार थार गाडी
डबल महाराष्ट्र केसरी आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेचे राज्य संघटक चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून उद्या (दि.29) बैलगाडी शर्यतीचे आयोजन करणार आहेत. त्या शर्यतीच्या मैदानातच 101 पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ करणार आहेत. कवठेमहांकाळमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अंबाबाई देवीची यात्रा आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन कवठेमहांकाळमध्ये करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विजयी गुलाल उधळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी या बैलगाडी शर्यतीच्या मैदानावरच 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये महायज्ञ घेत असल्याचे चंद्रहार पाटील यांनी जाहीर केले आहे.
विजेत्याला महिंद्राची थार बक्षिस
याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रहार पाटील म्हणाले की, 29 तारखेला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे चार लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या स्पर्धेला आम्ही मुख्यमंत्री केसरी असे नाव दिलेले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेच्या मनात उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत. जिथे आम्ही शर्यतीचे आयोजन करणार आहोत तिथेच आम्ही महायज्ञ करणार आहोत. उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आम्ही महायज्ञाचे आयोजन केले आहे. देशिंग गावच्या माळावरती बैलगाडी, घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री केसरी जनरल बैलगाडी, घोडागाडी, एकेरी घोडा स्पर्धा होणार आहेत. प्रथम विजेत्याला महिंद्राची थार गाडी ही बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.