पुणे : करोना विषाणूचा नवीन उपप्रकार जेएन.१ चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर आज रविवारी जेएन.१च्या तब्बल नऊ रुग्णांची राज्यात नोंद झाली. त्यात ठाणे महापालिका हद्दीत पाच, पुणे महापालिका हद्दीत दोन, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. यामुळे आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशात जेएन.१ या उपप्रकाराचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर या उपप्रकाराचे गोव्यात काही रुग्ण आणि महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्ण हा ४१ वर्षांचा पुरूष होता. आता जेएन.१चे आणखी ९ रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक ५ रुग्ण ठाणे महापालिका हद्दीत आढळले आहेत. या रुग्णांमध्ये ८ पुरूष आणि एका महिलेचा समावेश आहे. त्यात ९ वर्षांचा एक मुलगा, २१ वर्षांची महिला, २८ वर्षांचा पुरूष आणि इतर रुग्ण ४० वर्षांवरील आहेत. केवळ पुण्यात आढळेल्या एका रुग्णाने परदेशवारी केली असून, तो अमेरिकेहून परतल्याचे समोर आले आहे.