पिंपरी : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरचा खंडाळा बोरघाटातील सायमाळ येथे रिक्षा व बस यांच्यात झालेल्या भिषण अपघातात दोन जण ठार झाले तर दोन जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी १०.५० च्या सुमारास हा अपघात झाला.
रिक्षा क्रमांक एमएच १४ एचएम ५२९६ मधून रेल्वेचे कर्मचारी लोणावळा येथील वेट अँड जॉय या वॉटर पार्क मध्ये आपली सुट्टी व्यतीत करून खोपोली रेल्वे स्टेशनकडे जात असताना, बोर घाटातील सायमाळ जवळच्या वळणावरील तीव्र उतारावर रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा पलटी होऊन खोपोलीकडून पुण्याकडे निघालेल्या एमएच ०४ जी ९९२५ या प्रवासी बसच्या ड्रायव्हर साईडला धडकली.
हा अपघात एवढ्या गंभीर स्वरूपाचा होता की यातील कुमार गौरव गौतम (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर शत्रूंजय त्रिपाठी (वय २७) हा गंभीर जखमी झालेला तरुण उपचारासाठी घेऊन जात असताना मयत झाला. राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक, रिक्षा चालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर व त्यांचे कर्मचारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोचत त्यांनी सर्वांच्या सहाय्याने मदतकार्य करून जखमींना रुग्णवाहिकेतून पुढे हलवले. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक पोलीस बोरघाट डिव्हिजनचे पोलीस सब इन्स्पेक्टर अनिल शिंदे आणि डेल्टा फोर्सच्या जवानांनी वाहतूक सुरळीत केली.
अपघातातील जखमी राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. तर कुमार गौरव गौतम आणि शत्रूंजय त्रिपाठी हे देखील सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत होते. रिक्षा चालक हा लोणावळा येथील रहिवासी असून तो खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे अपघाताचा तपास करत आहेत.