मुंबई : मुंबईत मागील काही वर्षापासून आगीच्या (Mumbai Fire) घटनामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत आगीच्या घटना थांबण्याचे काही नाव घेत नाहीत. दरम्यान, आता मुंबईतील काळबादेवी येथील मुंबादेवी (Muba Devi) मंदिराजवळ एका सहा मजली इमारतीला (Building) आग लागली आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग अत्यंत भयानक होती. काही क्षणात ही आग सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. या आगीत कोणतीही जीवितहानी नाही, मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, या भीषण आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही भाग कोसळला आहे. आगीनंतर या इमारतीत 50 ते 60 जण अडकल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. सध्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. आग विझवण्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात आला आहे. इमारतीच्या आणखी एका भागात कूलिंगची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वजण सुरक्षित आहेत. तरी देखील धुराचे लोट सुरुच आहेत.