File Photo : Rain
सांगली : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सांगली जिल्ह्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. सततचा पडणारा पाऊस आणि धरणातून होणारा विसर्ग यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासन अलर्ट झाले असून, एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून भारतीय लष्कराच्या पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तसेच सैन्य दलाची 90 जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, शहरात पुराचे पाणी शिरले आहे.
कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच व्हीनस कॉर्नर परिसर, सीपीआर ते महावीर कॉलेज रोडवरील जयंती नाल्यावर पाणी आले असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी प्रयाग चिखली परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.
98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी 47.5 फुटांवर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून प्रमुख 25 राज्य मार्ग बंद आणि 123 मार्ग बंद बंद झाले आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. 98 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून प्रति सेकंद 7212 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.