अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी
नागपूरमधून मोठी बामती समोर आली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख याच्या कारवर दगडफेक झाली असून यात ते गंभीर जखमी झाले आहेत. नरखेड येथील रॅलीची सांगता करून देशमुख तीनखेडा-भिष्णूरमार्गे काटोल येथे परतत असताना अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा माहिती आहे.
नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. अचानक काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हल्ल्यामध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी काटोलच्या रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती आहे. हा हल्ला नेमका कुणी केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला.ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला… pic.twitter.com/6oLoFyEoAy
— Supriya Sule (@supriya_sule) November 18, 2024
अनिल देशमुख यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला जबर मार लागल्यांच दिसत आहे. दरम्यान हा हल्ला भाजपच्या लोकांनी केल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. दुचाकीवरून आलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या घटनेची ठोस माहिती मिळालेली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या आहेत. या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. मात्र अन्य कोणताही तपशिल देण्यास नकार दिला आहे.
अनिल देशमुखांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाच्या बाहेर जमले होते. त्यामुळे तणाव काहीकाळ निर्माण झाला होता. दरम्यान भाजपाने ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपाचे काटोल मतदारसंघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी केला आहे.
प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.