पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा आरोप (फोटो सौजन्य-X)
Vijay Khadse on Nana Patole : माजी आमदार विजय खडसे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने मंगळवारी (30 ऑक्टोबर) अपक्ष अर्ज दाखल केला. उमरखेड विधानसभा मतदारसंघातून 2009 च्या निवडणुकीत खडसे हे काँग्रेसकडून लढले आणि विजयी झाले होते. त्यांनी उमरखेड मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षाकडे अर्ज केला होता. मात्र सर्वेक्षणात आपण अव्वल स्थानी होतो, असा दावाही खडसे यांचा आहे. याचदरम्यान विजय खडसे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केला आहे.
उमरखेड विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर तिकीट विक्रीचा गंभीर आरोप केला आहे.
हे सुद्धा वाचा: ‘भारतीय जनता पक्षाचे काम बोलते, सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या’; राम सातपुते यांचं विधान
२००९ साली काँग्रेसच्या तिकिटावर उमरखेड मतदारसंघातून विजयी झालेले खडसे यांनी या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनी दावा केला की पक्षाच्या सर्वेक्षणात ते सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले होते. परंतु, तरीदेखील पक्षाने त्यांना डावलून बाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिली, ज्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमधील कार्यकर्त्यांच्या भावना नाकारल्या जात असून, पक्षाचे नेतृत्व निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर देशभरात काँग्रेसच्या वातावरणाला बळ मिळाले होते. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी निवड समितीला विशिष्ट निकष पाळण्याचे निर्देश दिले होते. विशेषतः भ्रष्टाचारी व्यक्तींना तिकीट देऊ नये, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला होता. मात्र, नाना पटोले यांनी या निकषांकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या तिकीटाची विक्री केल्याचा गंभीर आरोप खडसे यांनी केला आहे.
खडसे यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याचा असा थेट आरोप काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतो. नाना पटोले यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काँग्रेसमध्ये तिकीट वाटपावरून असंतोष वाढत चालला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विजय खडसे यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने उमरखेड मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेससाठी असलेले मजबूत गड मानले जाणारे उमरखेड आता काँग्रेससाठी आव्हान बनले आहे.
हे सुद्धा वाचा: 288 जागांवर 7995 उमेदवार रिंगणात, महायुती-मविआमध्ये किती जागांवर कोण लढणार?
कोण विकाऊ आहे हे अख्या महाराष्ट्राला माहित आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर अधिक वक्तव्य करू इच्छित नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.