[blurb content=””]विदर्भातील गरीब बाल हृदयरुग्णांवर उपचार व सुश्रुषा करून त्यांचे प्राण वाचविण्याचे फोर्टीस हॉस्पीटल ने केलेले कार्य ईश्वरीय असून त्यांचे आभार मानावेत तितके कमी आहेत असे उद्गार आज सांस्कृतिक कार्य आणि वनमंत्री ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. मुलुंड येथील फोर्टीस हॉस्पीटलमधे चंद्रपूर येथून आलेल्या गरीब बाल हृदय रुग्णांची आणि त्यांच्या पालकांची त्यांनी भेट घेतली तेव्हा ते बोलत होते.
श्री माता कन्यका सेवा संस्था यांच्या माध्यमातून स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरीब बाल हृदय रुग्णांकरता विशेष वैद्यकीय योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विशेषतः चंद्रपूर भागातील अत्यंत गरीब अशा हृदयरुग्ण बालकांवर मुलुंडच्या फोर्टीस रुग्णालयात वनमंत्री ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे सीएसआर निधीतून उपचार करण्यात येतात. त्यात हृदयांच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. गरज असेल तर हृदय प्रत्यारोपणही केले जाते. आजवर अशा उपचारांतून चंद्रपूर जिल्ह्यातील 117 बाल हृदयरोग्यांची तपासणी करून उपचार केले गेले आहेत. त्यातील गंभीर 59 बाल हृदयरोग्यांवर शस्त्रक्रिया प्रस्तावित केली गेली. त्यातील 35 जणांवर शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. याचा उल्लेख करून ना. श्री मुनगंटीवार यांनी फोर्टीस रुग्णालयातील वैद्यकीय पथक आणि व्यवस्थापनाचे आभार मानले. इतरत्र “हम आपके है कौन” असे विचारले जात असतांना इथे मात्र वैद्यकीय पथक पारीवारिक भावना जोपासते आहे हे कौतुकास्पद आहे असे ते म्हणाले. “देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उभ्या पिकातून” या काव्यपंक्तीनुसार बालकांचे दुःख दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलवणे हे ईश्वरी कार्य वैद्यकीय पथकाच्या हातून पार पडत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी डॉ.धनंजय मालणकर यांनी बाल हृदय चिकित्सा विषयाची माहिती दिली. डॉ.स्वाती गारेकर यांनी तज्ञ वैद्यकीय पथकाचा परिचय करून दिला. या प्रकल्पाचे सुधीरभाऊंतर्फे समन्वयन करणारे आर.पी. सिंग यांनी आपले अनुभव सांगितले. या प्रकल्पात महत्वाची भूमिका बजावणारे डॉ.आशुतोष पांडे यांचे त्यांनी कौतुक केले. तसेच या मुलांची काळजी घेणारे राजेश सुरावार, शैलेंद्र बैस, सागर खडसे यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. यावेळी फोर्टीस रुग्णालय प्रशासनाच्या वतीने फोर्टीसच्या पश्चिम विभागीय संचालिका डॉ.एस नारायणी यांनी स्वागत केले.