सातारा जिल्ह्यात सापडले GBS चे चार रूग्ण (फोटो- टीम नवराष्ट्र)
सातारा: गेल्या काही दिवासांपासून पुण्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमने थैमान घातले आहे. आतापर्यंत पुण्यात 111 रुग्णांची नोंद करण्यात आली असून सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये दोन दोन रूग्ण आढळून आले आहेत. यासोबत नागपूरमध्येही 6 जणांना जीबीएसची लागण झाली आहे. राज्यातील वाढत्या जीबीएस रुग्णांची संख्या पाहता राज्यासह केंद्र सरकारची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आता सातारा जिल्ह्यात देखील जीबीएसचे 4 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.
सातारा जिल्ह्यात 4 रूग्ण सापडले आहेत. चारही रूग्णांचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आहे. शासकीय रूग्णालयात दोघांवर तर दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या चारही मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सातारा जिल्हा प्रशासन देखील सतर्क झाले आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सातारा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, या चारही रूग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. राज्यात सातत्याने जीबीएस रूग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील ‘या’ विहीरीमुळे पसरला GBS व्हायरस
पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णसंख्या 111 वर पोहोचली असून, यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रुग्णांपैकी 80% रुग्ण नांदेड गाव आणि नांदेड सिटी परिसरातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील परिसरातील असल्याचे निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
हेही वाचा: Guillain-Barre syndrome Pune update: पुण्यातील ‘या’ विहीरीमुळे पसरला GBS व्हायरस
जीबीएस प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि रुग्णांची प्रभावी उपचार सुविधा सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे काम करत आहेत. पुणे शहरातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे प्रकरणे वाढल्याचा संशय असल्याने, पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी आणि स्वच्छता यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र सरकारचे पथक रुग्णसंख्येचा अभ्यास करून प्रतिबंधात्मक उपाय सुचवणार असून, पुणे महापालिका आणि आरोग्य विभागाला योग्य ते उपाय राबवण्यासाठी मदत करेल. यामुळे पुण्यातील GBS प्रकरणांवर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.
केंद्रीय पथकाकडून पाहणी
गुलेन-बॅरे सिंड्रोमच्या (GBS) वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तज्ज्ञांचे पथक महाराष्ट्रात पाठवले आहे. या पथकात विविध क्षेत्रांतील सात तज्ज्ञांचा समावेश असून, त्यामध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC), दिल्ली, निमहान्स, बेंगळुरू, प्रादेशिक आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालय, तसेच पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) च्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेणे: पथक राज्याच्या आरोग्य विभागासोबत समन्वय साधून GBS प्रकरणांचे मूल्यमापन करेल.
सार्वजनिक आरोग्य उपाययोजना सुचवणे: परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथक सार्वजनिक आरोग्यासाठी आवश्यक शिफारसी देईल.
स्थानिक प्रशासनाला सहकार्य: पुण्यातील NIV चे तीन तज्ज्ञ सध्या स्थानिक प्रशासनासोबत प्रत्यक्ष मदत आणि सल्ला देत आहेत.
हेही वाचा: Pune GBS Update: गुइलेन बॅरी सिंड्रोमची धोक्याची घंटा; केंद्राचे आरोग्य पथक पुण्यात दाखल
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची भूमिका
केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि महाराष्ट्र राज्यासोबत सक्रिय समन्वय साधत आहे. मंत्रालयाने या संकटाचा सामना करण्यासाठी राज्याला आवश्यक सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली आहे. हे पथक आणि स्थानिक यंत्रणा तातडीने उपाययोजना राबवत असून, दूषित पाणीपुरवठ्याचा मुद्दा सोडवण्यासाठी तसेच रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील पावले उचलली जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी अधिकृत सूचना पाळाव्यात आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.