साताऱ्याच्या सुप्रसिद्ध कंदीपेढ्यासाठी GI मानांकनाच्या हालचाली
सातारा : ऐतिहासिक शाहू नगरीच्या परंपरेचा इतिहास तपासला तर तो कंदीपेढ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. या पेढ्याचे भौगोलिक मानांकन मिळवण्याच्या दृष्टीने सामूहिक व संघटित प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून सातारा शहरातील पेढा उत्पादक व्यापारी संघ एकत्र आला असून, त्यांची संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे.
साताऱ्याचा कंदी पेढा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या वाहन अर्थात चप्पलची चर्चा होते, त्याच पद्धतीने साताऱ्यात आल्यावर हमखास कंदीपेढ्याची खरेदी हे समीकरण ठरलेले आहे. या पेढ्याची महती जागतिक पातळीवर पोहोचली आहे. मात्र, त्याला भौगोलिक मानांकन आजपर्यंत मिळालेले नव्हते. ते मिळवून देण्याच्या दृष्टीने सातारा शहरातील सर्व कंदी पेढे व्यापारी एकत्र आले आहेत. वाराणसी येथील पद्मश्री पुरस्कार विजेचे डॉक्टर रजनीकांत हे जीआय मान्यता मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. पेटंट ऍटर्नी म्हणून अॅड. महेश निकम सहाय्य करत आहेत.
या संस्थेच्या नवनियुक्त अध्यक्षा करिष्मा मोदी, उपाध्यक्ष कन्हैयालाल राजपुरोहित, सचिव प्रशांत मोदी, खजिनदार योगेश मोदी, संस्थेचे सदस्य जयेश जोशी, विश्व प्रताप जाधव, स्वानंद लाटकर इत्यादी मान्यवर व्यापाऱ्यांचा या संस्थेमध्ये समावेश आहे. त्यांनी पेढ्याच्या भौगोलिक मानांकनासाठी अत्यंत शिस्तबद्ध प्रयत्न सुरू आहेत.
या संदर्भात अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करून साताऱ्याच्या कंदीपेढ्याला हे मानांकन कसे मिळवून देता येईल. यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील व सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शनी नागराजन यांचे सहकार्य या प्रकल्पाला लाभले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा या कंदीपेढ्याच्या भौगोलिक मानांकनाचे प्रयत्नांचे कौतुक केले आहे.