(फोटो सौजन्य-AI एआय)
तालुक्यातील पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला. गावातील शांताबाई बिसन बनसोड यांचे मंगळवारी निधन झाले. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावातील स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र, स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे मृतदेह तब्बल दोन तास रस्त्यावर ठेवावा लागला.
गट क्रमांक ३८१/२ मधील स्मशानभूमीसाठी निश्चित करण्यात आलेल्या जागेवर गोवर्धन शेंडे यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अंत्यसंस्कारासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तसेच नायब तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्नकेला. अखेर प्रशासनाच्या उपस्थितीत एका शेतशिवारातील जागेत शांताबाई बनसोड यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिक्रमण हटविण्याची मागणी; गावातील स्मशानभूमीच्या जागेवर पळसगाव डव्वा येथे स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने अंत्यसंस्कारासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला.
त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत गावकरी व मृताच्या नातेवाईकांची समजूत काढली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर शेतजमिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
Gondiya News: पुरामुळे तुटतोय ९६ गावांचा संपर्क! पावसाळ्यामध्ये वैनगंगा आणि बाग नदीला येतोय पूर
गावातील स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. मात्र, शेतकऱ्याची नेमकी जागा किती आणि स्मशानभूमीसाठी किती जागा निश्चित आहे, याची महसूल विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे. महसूल प्रशासनामार्फत जागेची मोजणी करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल. तसेच हा तिढा लवकरच सोडविण्यात येईल. असे हसीना जांभूळकर, सरपंच, पळसगाव डव्वा यांनी सांगितले.
अतिक्रमणधारक शेतकरी गोवर्धन शेंडे यांना विचारपूस करण्यात आली. त्यांच्या मतानुसार त्यांच्या मालकी हक्काची साडेपाच एकर शेतजमीन आहे. मात्र, त्यांना लवकरच नोटीस बजावली जाणार आहे. त्यांच्या शेतजमिनीची मोजणी केली जाईल. त्यानंतर गावकऱ्यांच्या स्मशानभूमीचा तिढा सोडविला जाईल.- जे. आर. जांभूळकर, नायब तहसीलदार, सडक अर्जुनी.



