फोटो सौजन्य- सोशल मीडिया
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय दूरदृष्टी असलेले एक उत्तुंग व्यक्तीमत्व होते. त्यांनी राष्ट्रासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दृष्टी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची होती. त्यांच्या दृष्टिकोनामुळेच भारतीय समाजातील अस्पृश्यता आणि भेदभावाच्या विरोधात महत्वपूर्ण सुधारणा घडल्या असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज सांगितले.
दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल श्री. राधाकृष्णन संबोधीत करीत होते.कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले, बाबासाहेब जातीयवादापासून मुक्त राष्ट्र पाहू इच्छित होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला शिक्षण आणि विकासाची समान संधी मिळेल. दारिद्र्य, असमानता यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य केवळ शिक्षणात आहे, हे आपण जाणतो. शिक्षणाच्या विचारांना बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांचे इंदू मिल येथील भव्य स्मारक देशभरातील विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारतातील विविध राज्यांतूनही अनुयायी येतात. त्यांचे अतूट प्रेम, आदर आणि शिस्तबद्ध आचरण खरोखरच प्रेरणादायी आहे.
देशाच्या प्रगतीचे श्रेय डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सध्या भारत जगात पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून लवकरच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार आहे. आपला देश सध्या विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक प्रगती करीत आहे. या प्रगतीचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार सुरु- उपमुख्यमंत्री अजित पवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून शासनाचा कारभार सुरू आहे. राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे, याची काळजी शासनाने कायम घेतली आहे. भविष्यातही वंचित, दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण होईल, यासाठी काम केले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.