मुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या टेनिसपटूंपैकी एक असलेला बोपण्णा प्रथमच टेनिस लीगमध्ये सहभागी होणार आहे. टेनिस खेळात क्रांती घडवून आणण्याचे लीगचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आतापर्यंत टेनिस प्रिमियर लीगचे पाच हंगाम यशस्वी पूर्ण झाले असून, सहाव्या पर्वाची तीव्रता वाढू लागली आहे. भारताचा ४४ वर्षीय बोपण्णाने कारकिर्दीत दोन ग्रॅण्ड स्लॅम विजेतीपदे (२०२४ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरी) मिळविली आहेत. तीन ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान
रिओ २०१६ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बंगळुरुचा रहिवासी असलेल्या बोपण्णाने वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषविणारा सर्वात वयस्क खेळाडू म्हणून मान मिळविला होता. कारकिर्दीत आतापर्यंत त्याने २५ हून अधिक विजेतीपदे मिळविली आहेत. टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा बोपण्णा लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झानंतर चौथा टेनिसपटू आहे. या चारही भारतीय टेनिसपटूंनी कारकिर्दीत एकतरी ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद मिळविले आहे.
दोन दशकाहून अधिक काळ एटीपी मालिकेचा भाग
जवळपास दोन दशकाहून अधिक काळ एटीपी मालिकेचा भाग असलेला बोपण्णा आणि टेनिस प्रिमियर लीगच्या नव्या शैलीत खेळताना दिसणार आहे. सर्व फ्रॅंचाईजी उपांत्य फेरीत पात्र होण्यासाठी प्रत्येकी पाच सामने खेळणार आहेत. लीग क्रांतिकारक अशा २५ गुणांच्या पद्धतीत खेळविली जाणार आहे. दोन फ्रॅंचाईजींच्या सामन्यात पुरुष एकेरी, महिला एकेरी, मिश्र दुहेरी, पुरुष दुहेरी सामन्यांचा समावेश असेल. प्रत्येक सामन्यात १००० गुण असतील. प्रत्येक श्रेणीचे मूल्य २५ गुण असेल. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात ५०० गुण (१०० गुण बाय ५ सामने) गुण कमावता येणार आहेत. गुणतालिकेतील पहिले चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
काय म्हणाला रोहन बोपण्णा पाहा
अत्यंत अनुभव गाठिशी असलेला बोपण्णा, सुमित नागल, फ्रान्सचा ह्युगो गॅस्टन, अर्मेनियाचा एलिना अवनेसियान या प्रमुख खेळाडूंसह विजेतेपदासाठी प्रयत्ननशील राहिल. लीगचे सामने मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) कोर्टवर होणार आहेत. टेनिस प्रिमियर लीगचा एक भाग होताना मला खूप आनंद झाला आहे. मी खूप रोमांचित आहे. विशेषतः लीगच्या नावीन्यपूर्ण २५ गुणाच्या पद्धतीसह ही लीग तरुण खेळाडूंना आकर्षित करेल, असा मला विश्वास वाटतो, असे रोहन बोपण्णाने सांगितले.
रोहन बोपण्णाची उपस्थिती प्रेरणादायी
या प्रसंगी बोलताना टेनिस प्रिमियर लीगचे सहसंस्थापक कुणाल ठाकूर म्हणाले, आमच्यासोबत अतिशय गतीमान आणि अनुभवी खेळाडू रोहन बोपण्णा सोबत असणे खूप आनंददायी आहे. त्याची क्षमता आणि कारकिर्द अशी आहे की त्याची आम्हाला वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. त्याची उपस्थिती केवळ लीगच्या सहाव्या हंगामाला नाही, तर अवघ्या टेनिस विश्वालाही प्रेरित करेल.
रोहन बोपण्णा हा टेनिस विश्वातील एक प्रमुख खेळाडू आहे. लीगच्या सहाव्या पर्वात खेळण्यास बोपण्णा तयार झाल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्यामुळे मुंबईसह टेनिस विश्वातही त्याची चर्चा होईल. बोपण्णासह अन्य प्रमुख खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहेत, असे टेनिस प्रिमियर लीगच्या सह संस्थापक मृणाल जैन यानी सांगितले.