कुत्रा-मांजर-गाढवांनाही उमेदवारीची कायदेशीर परवानगी द्या; बळीराजा शेतकरी संघटनेची निवेदनाद्वारे अजब मागणी (फोटो - सोशल मीडिया)
कराड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक पण परखड शब्दांत बोट ठेवणारे एक आगळे-वेगळे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी या निवेदनाद्वारे थेट कुत्रा, मांजर व गाढवांनाही निवडणूक लढवण्याची कायदेशीर तरतूद करावी, अशी मागणी केली आहे.
सध्या प्रस्थापित नेत्यांनी सर्वच निवडणुकांमध्ये आपल्या कुटुंबातीलच सदस्यांना उमेदवारी देण्याची सवय लावून घेतली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका ते महानगरपालिका अशा प्रत्येक स्तरावर एकाच घराण्यातील उमेदवार रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, काही नेत्यांना इच्छेप्रमाणे कुटुंबातील उमेदवार उपलब्ध नसल्याने बाहेरचा उमेदवार शोधावा लागत असून, विश्वासू उमेदवार न मिळाल्याने त्यांची मोठी अडचण होत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. ही अडचण लक्षात घेता आणि प्रस्थापित नेत्यांच्या ‘विश्वासाच्या’ प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी कुत्रे, मांजरे व गाढव यांनाही निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी, अशी सूचक आणि उपरोधिक मागणी करण्यात आली आहे.
यासाठी महाराष्ट्र विधिमंडळात कायदेशीर मान्यता घेऊन स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद आहे. इतकेच नव्हे, तर या प्राणी उमेदवारांसाठीही स्त्री-पुरुष, खुला, ओबीसी व मागासवर्गीय आरक्षणाची तरतूद लागू करावी, जेणेकरून प्रस्थापित नेत्यांना आपल्या कुटुंबाबाहेरील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी देण्याची वेळ येणार नाही, असा टोला पंजाबराव पाटील यांनी लगावला आहे.
आता कोणावरही उरला नाही विश्वास
सध्याच्या परिस्थितीत अनेक नेत्यांचा कुटुंबातील व्यक्तींव्यतिरिक्त कोणावरही विश्वास उरलेला नसल्याची खंत व्यक्त करत मतदारसंघाचा विकास करायचा असला तरी बाहेरच्या उमेदवारांमुळे अडचणी येतात, अशी मानसिकता सध्या रुजत चालल्याचा गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. ही मागणी जनतेच्या भावना मांडणारी असून, याला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळेल आणि कोणीही याला विरोध करणार नाही, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Solapur Municipal Election: प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी: ईव्हीएम वितरण, स्ट्रॉग रूम, मतमोजणी ठिकाणे निश्चित






