संग्रहित फोटो
तासगाव/मिलिंद पोळ : तासगाव तालुका आणि परिसरातील द्राक्षबागांवर यंदाच्या अनियमित आणि सततच्या पावसाचे सावट पसरले आहे. मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस आता ऑक्टोबर महिन्यातही कायम असल्याने द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत आहे. या हवामानामुळे बागांची वाढ, काड्यांची पक्वता आणि घड पडण्याच्या प्रक्रियेलाच मोठा फटका बसला आहे.
तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजपूर्व आणि जत या भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष उत्पादन घेतले जाते. येथील अनेक बागांमध्ये मार्च व एप्रिल महिन्यात खरड छाटणी करण्यात आली होती. मार्च महिन्यात छाटणी केलेल्या बागांना काही प्रमाणात सुमारे ४५-५० दिवस चांगले ऊन मिळाल्याने काड्या पक्व होण्यास थोडीशी मदत झाली आहे. मात्र, एप्रिलमध्ये खरड छाटणी झालेल्या बागांवर मात्र पावसाचे थेट संकट ओढावले आहे. या बागांना आवश्यक असलेले ६० दिवसांचे कडक ऊन मिळाले नाही. परिणामी या बागांमधील काड्या वरून जरी तपकिरी व पक्व दिसत असल्या तरी त्यांच्या आतील विकास पूर्ण न झाल्याने घड पडण्याचे प्रमाण कमी होईल, अशी भीती उत्पादकांना वाटते आहे.
तासगाव तालुक्यातील काही धाडसी शेतकऱ्यांनी हंगामपूर्व फळ छाटणी घेतली आहे. परंतु आता सुरू झालेला पाऊस पुन्हा वाढल्याने या बागांवर रोगराईचे संकट ओढावले आहे. फुलोऱ्यातील नुकसान, घडांची कुज, पानांवरील बुरशी, द्राक्षबागेतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे असंतुलन यामुळे हंगामपूर्व छाटणी केलेल्या बागावर संकट दिसू लागले आहे.
ऊन-पावसाचा पिकावर थेट परिणाम
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकतो. त्यामुळे तालुक्यातील द्राक्ष उत्पादक सध्या कधी ऊन पडते? या प्रश्नाने अक्षरशः थांबले आहेत. द्राक्ष घडांचे स्वरूप, वजन आणि टिकाऊपणा यावर ऊन-पावसाचा थेट परिणाम होत असल्याने, ऑक्टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या मुख्य फळ छाटणीवर हवामान निर्णायक ठरणार आहे.
हवामानात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता
द्राक्षबागांच्या अवस्थेकडे पाहता, शेतकऱ्यांच्या आशा अजून पूर्णतः मावळलेल्या नाहीत; मात्र पावसाचा अतिरेक थांबला नाही, तर तासगाव तालुक्याला यंदा ‘पावसाने मारलेला द्राक्ष हंगाम’ असे वर्णन ऐकावे लागेल, अशी भीती द्राक्ष पट्ट्यातून व्यक्त होत आहे. दरम्यान १५ ऑक्टोबरनंतर हवामानात आणखी काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासाकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आणखीन चिंताग्रस्त झाला आहे.
तालुक्यातील काही भागात पावसामुळे जमिनीत ओल वाढल्याने द्राक्ष वेलीच्या मुळीवर परिणाम आणि इतर बुरशीजन्य रोगांचा प्रसार होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त कीडनाशके व फवारणी खर्च करावा लागणार आहे. पाऊस थांबला नाही तर यंदा उत्पादनात किमान ३० ते ४० टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. -सिद्धनाथ जाधव, द्राक्ष उत्पादक व सल्लागार, सावळज