खलिस्तानी दहशतवादी (Khalistani Terrorist) हरविंदर सिंह रिंदानंच (Harvinder Singh Rinda) नांदेडमध्ये (Nanded) आरडीएक्स (RDX) पाठवलं असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हरविंदर सिंह रिंदा यानं स्लीपर सेलच्या मदतीनं आरडीएक्स पाठवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुत्रांच्या हवाल्यानं आलेल्या माहितीमुळे या गोष्टीची माहिती महाराष्ट्र एटीसला (Maharashtra ATS) नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
[read_also content=”नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीत आग – सहा कंपन्या जळून खाक, एकाचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/fire-in-pavne-midc-of-navi-mumbai-six-companies-affected-nrsr-277147.html”]
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ५ ते ६ महिन्यांपूर्वी मुंबईला इनपुट मिळालं होतं. त्यानुसार, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हा अलर्ट हरविंदर सिंह रिंदा याच्यासंदर्भातच होता. त्यामुळे नांदेडमध्ये सापडलेलं आरडीएक्स हे मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स नांदेडमध्ये आलं, पण याबाबत महाराष्ट्र एटीएसकडे यासंदर्भात कोणतीच माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंह रिंदानंच नांदेडमधील लोकांकडून जवळपास २०० कोटींची वसुली केली आहे. या पैशांचा उपयोग तो दहशतवादी कारवायांसाठी करणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं आहे. सध्या रिंदा पाकिस्तानातील इस्लामाबाद शहरात असून यापूर्वी तो लाहोरमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील बस्तारा जिल्ह्यातून ४ दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, महाराष्ट्र पोलीस सतर्क झाले आहेत. महाराष्ट्र पोलीस दहशतवाद्यांच्या पूर्वीच्या आरडीएक्सच्या खेपेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या कथित मानवी स्फोटामागे हरविंदर सिंह रिंदाचाच हात असल्याचं लुधियाना येथील न्यायालयाकडून सांगण्यात येत आहे, त्यादरम्यान रिंदानं स्फोटापूर्वी संशयितांशी चार संभाषणं केली असल्याचंही समोर आलं आहे.
दरम्यान, हरियाणात अटक करण्यात आलेल्या चार अतिरेक्यांचा म्होरक्या हरविंदर सिंग रिंदा याच्या नांदेडमधील साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू करण्यात आलं आहे. नांदेड पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या आदेशानुसार, संशयितांच्या घरी झडतीची मोहीम राबवली जात आहे. काल हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर चार अतिरेक्यांना अटक केली होती. यावेळी चौघांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी जप्त करण्यात आला होता. नांदेड आणि आदीलाबादमध्ये मोठा घातपात करण्याचा कट असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. सध्या पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.