आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य (फोटो - सोशल मिडिया)
कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये एप्रिल महिन्याची रक्कम जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. याबाबत आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भाष्य केले आहे.
एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर खात्यांना/विभागांना व्हायला हवी होती ती झाली नाही. यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे.लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल.”
पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, “राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे राज्यातील अन्य निवडणुका देखील एकत्रित लढवणे अपेक्षित आहे. एकत्रित लढलो तर जे चित्र राज्यात दिसले तेच इकडेही दिसेल. पंचगंगा नदी प्रदूषणा संदर्भात बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, “पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहेच. प्रदूषण थांबवण्यासाठी नमामी पंचगंगा योजनेच्या आराखड्याची आणि निधीची तरतूद करण्यात येईल.”
पुढे बोलताना प्रकाश आबिटकर म्हणाले, “अलमट्टी धरणाची ऊंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे. या धरणाची ऊंची वाढल्यास सांगली, कोल्हापूरला सर्वाधिक फटका बसणार आहे. ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वकील आणि जलतज्ञांची फौज उभा करत असेल, तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभी करू.”
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी गुड न्युज; एप्रिलचा हफ्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही रक्कम एप्रिल महिन्याची असून मे महिन्याची रक्कम अद्याप जमा झालेली नाही. यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप शासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. लाभार्थीं महिलांनी आपली रक्कम जमा झाली आहे की नाही, हे खात्री करण्यासाठी आपले बँक खाते तपासावे. आवश्यक असल्यास बँक शाखा, स्थानिक पंचायत कार्यालय किंवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.