सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी हजेरी लावली. शहाजीबापू हे शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा (Shahajibapu Patil Car Accident) अपघात झाला. यामध्ये एकजण ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शहाजीबापू पाटील उपस्थित होते. शहाजीबापू शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत होते. त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस संरक्षक गाडीचा ताफा होता. त्यांचा ताफा माळीवाडी नाजरा येथे आला असता त्याचदरम्यान आमदाराच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकीस्वार येऊन धडकला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
घटनास्थळी लोकांची एकच गर्दी
शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. शहाजीबापू यांचा ताफा भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी समोरून वेगाने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आमदारांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
माळीवाडी नाजरा येथील घटना
सोलापुरातील माळीवाडी नाजरा येथे शहाजीबापूंचा ताफा आला असता हा भीषण अपघात झाला. आमदाराच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलीस गाडीवर दुचाकीस्वार येऊन धडकला. यामध्ये एकजण ठार झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.