फोटो सौजन्य - Social Media
अकोला : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावत काही भागांना चांगलाच दिलासा दिला, तर तेल्हारा तालुक्यातील तीन महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने गुरुवारपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच ढगांच्या गडगडाटासह विजा चमकण्याचीही शक्यता असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांना झाडाखाली किंवा विजेच्या तारेजवळ बांधू नये तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. हिवरखेड महसूल मंडळात ६६.८ मिमी, अडगाव येथे ९९.५ मिमी आणि पंचगव्हाण येथे ८०.३ मिमी पाऊस झाला. या तिन्ही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्याची सरासरी पर्जन्यमान नोंद १५.७ मिमी इतकी झाली.
दरम्यान, जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मृग आणि रोहिणी नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. महागडी बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदी करूनही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. आता पावसाने हजेरी लावल्यानंतर तूर, कपाशी आणि सोयाबीनच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी पुन्हा शेतात सक्रिय झाला आहे.
तालुकानिहाय पावसाच्या नोंदींमध्ये तेल्हारा येथे ५२.७ मिमी, अकोट येथे ४०.७ मिमी, बाळापूर येथे १६.० मिमी, अकोला येथे ५.० मिमी, पातूर येथे ३.८ मिमी, मूर्तिजापूर येथे १.० मिमी आणि बार्शीटाकळी येथे ०.१ मिमी पावसाची नोंद झाली. आगामी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.






