मुसळधार पावसाचा शेतीपिकांना मोठा फटका; कांदा-टोमॅटोच्या दरावर परिणाम(सौजन्य : iStock)
तासगाव : तासगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागाला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. मणेराजुरी आणि विसापूर भागात मंगळवारी गारपीट झाली. या वादळी आणि अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. बेदाण्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पुढील आठ दिवस सांगली जिल्ह्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शेतीमाल गोळा करण्यासाठी व बेदाणा शेडवर आच्छादन टाकण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ झाली. मंगळवारी मणेराजुरी आणि तासगावपूर्व भागात जोरदार वादळी वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली. मणेराजुरी, उपळावी, योगेवाडी, सावर्डे, गव्हाण आदी गावांसह दुपारी तीन ते चारच्या दरम्यान सुमारे तासभर दमदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस विजांच्या कडकडाटात सुरू होता.
हेदेखील वाचा : Weather Update : सांगलीत गारपीट; तासगाव, वाळवा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी
गारपिटीमुळे ज्यांच्या द्राक्षबागेत अजूनही द्राक्षे शिल्लक आहेत, तेथे मोठे नुकसान झाले आहे. सध्या खरडछाटण्या सुरू आहेत. परंतु, अजूनही त्या छाटणी झालेल्या झाडांना पालवी न फुटल्याने द्राक्ष काडीचे नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्याने अनेक घरांवरील पत्रे, कागद उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरावर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्या उडून रस्त्यावर पडल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले.
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका
कडब्याच्या गंजी, बुचडे, शाळू, मक्का, उर्वरित पिकांना गारपिटीचा आणि पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. याशिवाय तालुक्यातील चिंचणी, लोढे, कौलगे, बस्तवडे, वाघापूर, सिद्धेवाडी, दहिवडी, चिखलगोठण, मांजर्डे, गोटेवाडी, हातनोली, खुजगाव, सावळज, आरवडे येथे पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर विद्युतप्रवाह खंडित झाल्याने अनेक गावे अंधारात होती.
बुधवारी सकाळपासून ढगाळ हवामान
सांगलीत बुधवारी सकाळपासून ढगाळ हवामान होते. यामुळे तापमान 36 अंश सेल्सिअस असताना 40 अंश भासत होते. हवेतील आर्द्रता 40 टक्के असताना सायंकाळी ढगांची आकाशात गर्दी होऊन पूर्वेकडील वाऱ्यासोबत पावसाचे आगमन झाले. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी परिसरात गारपीटसह पाऊस झाला. तर खानापूर भागांत पाऊस झाला. तालुक्यातील काही भागांत वाळवा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या.
हेदेखील वाचा : Weather Update : मालेगावात अवकाळी पावसाची हजेरी; अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ