तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा पुन्हा कहर
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच मान्सून येण्याआधीच अवकाळीचा हाहाकार सुरू आहे. सोमवारी जोरदार पावसांनंतर मंगळवारी देखील रात्रीच्या सुमारास मोठा पाऊस झाला. यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीवितहानीसह पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस कोसळत आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, रात्री साडेअकरा वाजेनंतर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी दिली. यामुळे अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर पशुधनाचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातून प्राप्त झाली आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने सर्वाधिक पशुधनाचे नुकसान लातूर जिल्ह्यात झाले.
परतुरात एकाचा मृत्यूः घरांचेही नुकसान
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एरंडी येथील शेतकरी बालकिशन बाबुराव चलवाड यांची सोमवारी रात्री झालेल्या पावसात वीज पडून एक गाय मरण पावली. तर मंगळवारी रात्री घनसावंगी तालुक्यातील खालापुरी येथील एकनाथ किसन मरकड यांची म्हैस वीज पडून मयत झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली आहे.
वीज अंगावर पडून एकाचा मृत्यू
परतूर तालुक्यातील सालगाव येथील सुनील विलास गाढवे (अंदाजित वय २५) यांचा मंगळवारच्या पावसात अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. यासोबतच शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी बु. येथील गोविंद विश्वनाथ शिंदे यांच्या घरावर वादळ वाऱ्यामुळे झाड पडून घराचे नुकसान झाले, तर अंबड शहरात मोठे झाड पडून घर आणि दुकानाचे नुकसान झाले आहे. विजेच्या तारांवर झाड पडल्याने त्यावर अवलंबून असलेल्या वीजग्राहकांचा वीज पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.
पशुधनाचेही मोठे नुकसान
निलंगा तालुक्यातील आनंदवाडी येथे गुलाब चंदर मुळे यांची एक म्हैस वीज पडून दगावली. तर शिरोळ (वां) येथील शेतकरी लक्ष्मण शिवराम गिरी यांची गाय सांयकाळी साडेचार वाजता वीज पडून मयत झाली. जळकोट तालुक्यात झालेल्या पावसामध्ये उमरदरा येथील नवनाथ पुंडलिक नागरगोजे यांची म्हैस वीज पडून मयत झाली.