मराठवाड्यात पावसाची धुंवाधार बॅटिंग; धाराशिव, लातूरसह नांदेडमध्येही मुसळधार पाऊस; पुढील काही दिवस... (संग्रहित फोटो)
बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच जवळपास आठवडाभर दडी मारल्यानंतर गणरायासोबतच वरुणराजानेही मराठवाड्यात जोरदार आगमन केले आहे. बुधवारपासून पावसानेही गणरायाला सलामी देत मराठवडाभर जलवृष्टी केली. यात नांदेड, लातूरसह जालना आणि धाराशिव जिल्ह्यात एकूण 48 सर्कल्समध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान, गुरुवारीदेखील पावसाचे तूफान बॅटिंग पाहिला मिळाली.
यंदा समाधानकारक पर्जन्यमान आहे. मान्सूनच्या आधीच मे मध्ये तूफान बरसून गेल्यानंतर जून कोरडा गेला. मात्र, जुलैपासून आजतागायत पाऊस सलग हजेरी देत आहे. दरम्यान, मागील आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. पाणीसाठे भरले असले तरी पिकांना पावसाच्या पाण्याची गरज होती. पाऊस रुसल्याने पिके संकटात आली होती. यामुळे शेतकऱ्यांची चिंताही वाढली होती. दरम्यान, बुधवारी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यानुसार गणरायाच्या आगमनासोबत पावसानेही विभागात जोरदार पुनरागमन केले आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयातनप्राप्त आकडेवारीनुसार, बुधवारी विभागातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अनेक सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. सोबतच जालना आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येकी एका सर्कलमध्येही अतिवृष्टी झाल्याची माहिती आहे. एकूण ४८ सर्कल अतिवृष्टीखाली आल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
संभाजीनगर अत्यल्प पाऊस
नांदेड आणि लातुरात जोरदार बॅटिंग केलेली असताना इतर जिल्ह्यात मात्र अत्यल्प पाऊस झाला. यात सर्वात कमी ५.४ मिमी संभाजीनगर जिल्ह्यात कोसळला. इतर जिल्ह्यातही पावसाची जेमतेम हजेरी राहिली.
एनडीआरएफ जवानांची मदत
नायगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. नायगाव शहरातील अनेक वस्त्यांत पाणी शिरले. एनडीआरएफच्या जवान नागरिकांच्या मदतीला उतरले आहेत. एनडीआरएफच्या टीमने पुरात अडकलेल्या एका कुटुंबाला बाहेर काढले.