हिमाचल पाऊस: चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग पुन्हा बंद
चंदीगड : महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात अतिमुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसाचा फटका हिमाचल प्रदेशातील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गला बसला. हे मार्ग पुन्हा बंद करण्यात आले. आता हा महामार्ग पूर्ववत कधी होईल, हेही सांगणे कठीण झाले आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे.
पांडोह धरणाजवळील कात्री वळणाजवळ राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे कोसळला आहे. आता याठिकाणी पायी जाणेही कठीण बनले आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाचा मोठा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. बानालाजवळील टेकडीवरून मोठी दरड पडल्याने बुधवारी रात्री महामार्ग आधीच बंद करण्यात आला होता. नऊ माईलजवळ मोठी मालवाहू वाहने थांबवण्यात आली होती. बानाला येथे महामार्ग पूर्ववत करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वी कात्री वळणाजवळ हा महामार्ग मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे.
हेदेखील वाचा : Himachal Pradesh Rain: हिमाचलमध्ये बियास नदीचे तांडव; भयंकर प्रवाहामुळे लेह हायवेच…; 50 किमी पर्यंत वाहतूक कोंडी
दरम्यान, बानाला हा महामार्ग द्वाद्याजवळ तीन दिवसांनी पूर्ववत करण्यात आला होता. तर मंडी ते कुल्लू मार्गे काटोला मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. लहान वाहने एका तासाच्या अंतराने सोडली जात आहेत. आता कुल्लू-मनालीसाठी हा एकमेव मार्ग शिल्लक आहे. या मार्गावर मोठा ताण जाणवू लागला आहे.
2023 मध्येही 8 महिने बंद होता मार्ग
ज्या ठिकाणी महामार्ग आता पाण्याखाली आहे, त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या ठिकाणी, २०२३ च्या आपत्तीतही असेच दृश्य दिसून आले होते. त्यावेळी महामार्गाचा मोठा भाग कोसळला आणि तो पांडोह धरणात बुडाला. महामार्ग पुन्हा बांधण्यासाठी आणि येथे तो पूर्ववत करण्यासाठी आठ महिने लागले. जुना मार्ग वाहतुकीसाठी दुरुस्त करून तो पूर्ववत करण्यात आला. परंतु आता जिथे बुडाला आहे, तिथे असा कोणताही मार्ग असण्याची शक्यता नाही.