Manoj Jarange patil on maratha arakshan
29 Aug 2025 12:14 PM (IST)
मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले असले तरी आझाद मैदानावर असेलल्या आंदोलकांनी आंदोलकांसाठी जेवण बनवण्यास सुरूवात केल्याचे दिसत आहे. तर अनेक आंदोलक परतीच्या वाटेवर निघाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांनी मात्र गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याची घोषणा केली आहे.
29 Aug 2025 11:16 AM (IST)
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. बावनकुळे म्हणाले, “संपूर्ण देशात विविध समाजाचे आंदोलन सुरू होते. EWS निर्णयानंतर ओबीसीबाहेर असलेल्यांना 10 टक्के आरक्षण मिळाले. यासोबतच सारथी संस्थेमार्फत मराठा समाजाला लाभ मिळत आहे. भाजपची स्पष्ट भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे.काँग्रेस ओबीसीमधून आरक्षण द्या, अशी भूमिका घेत आहे का, हे स्पष्ट करावे. आमच्या सरकारने मराठा समाजाला आधीच 10 टक्के आरक्षण दिले आहे. आता आणखी काय देता येईल, यावर प्रयत्न सुरू आहेत. पुढच्या काळात मराठा समाजाला न्याय देण्याचे आमचे सरकार कटिबद्ध आहे.”
29 Aug 2025 10:38 AM (IST)
मुंबईतील आंदोलनाला नाशिक जिल्ह्यातून रसद पुरवणार, असल्याची प्रतिक्रीया मराठा आंदोलक विलास पांगरकर यांनी दिली आहे. दरम्यान नाशिकचं ग्रामदैवत कालिका मातेचं दर्शन घेऊन मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले, शेकडो आंदोलक काही, बस, ट्रेन तर काही खाजगी वाहनांनी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
29 Aug 2025 10:35 AM (IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहे. ते आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर धुळ्यातून शेकडो मराठा आंदोलक रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही व आमच्या इतर मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आता माघार घेणार नाहीत आमचे हे आंदोलन चालूच राहील अशी ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी यावेळी घेतली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगला स्थापला आहे. त्यामुळे आता फडणवीस सरकार मनोज जरांगेपाटील यांच्या मागण्या मान्य करते का? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.' अशी प्रतिक्रीया मराठा आंदोलक विनोद जगताप यांनी दिली आहे.
29 Aug 2025 10:32 AM (IST)
ओबीसीचे प्रमाणपत्र असलेल्याअनेकांना आरक्षणाचा लाभ मिळाला, त्यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या ओबीसीचे प्रमाणपत्र आहे. त्याचे सर्वेक्षणासाठी एक समिती तयार कऱण्यात आली जे ओबीसी आढळून आले त्यांना आरक्षण मिळाले,त्याचे सर्वेक्षण अजूनही सुरूच आहे. पण जे ओबीसी आहेत त्यांना पण त्यांना प्रमाणपत्र मिळत नसेल तर त्यांनाही मिळेल. पण सरसकट आरक्षण याला आमचा विरोध आहे. असं सरसकट आरक्षण मिळू शकत नाही.त्याला आमचा विरोध आहे. असं सरसकट मागता, जे ओबीसी आढळून येतील, त्याला आपण प्रमाणपत्र देऊ. असं भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
29 Aug 2025 10:25 AM (IST)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पुजारा म्हणाला, “मी जेव्हा यूकेमध्ये होतो तेव्हा मी या हंगामाची खूप उत्सुकतेने वाट पाहत होतो. पण घरी परतल्यानंतर जेव्हा मी रणजी ट्रॉफीची तयारी सुरू करणार होतो, तेव्हा मला माझ्या कुटुंबाशी, माझ्या मित्रांशी आणि माझ्या काही सहकाऱ्यांशी बोलायचे होते. या सिझनमध्ये माझ्या खेळण्याबद्दल त्यांचे काय मत आहे? याबाबत त्याने स्पष्ट सांगितले आहे”. बातमी सविस्तर वाचा...
29 Aug 2025 10:25 AM (IST)
मराठा आरक्षणासाठी लढा देताना आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनेच पार पाडावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलकांना केले आहे. “कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही, आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नाही. मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय, डोक्यावर गुलाल उधळल्याशिवाय इथून हालायचं नाही. सरकारने आपल्याला सहकार्य केलंय, आपणही सरकारला सहकार्य करावं. समाजाचं नाव खाली जाणार नाही, याची काळजी घ्या. दारु पिऊन धिंगाणा घालू नका. समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका. मला गोळ्या घातल्या तरी चालतील, पण मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही. राजकीय पोळी भाजणाऱ्यांपासून सावध राहा. आंदोलनाचा गैरवापर होऊ देऊ नका. मुंबई दोन तासांत मोकळी करा, पोलिसांना सहकार्य करा. एकाही पोलीसाला नाराज होऊ देऊ नका.”
29 Aug 2025 10:15 AM (IST)
मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही. सर्वांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं. पोलिसांना सहकार्य करा, आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे गडबड करू नका, पुढच्या दोन तासात मुंबई मोकळी करा. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठणार नाही. समाजासाठी शेवटपर्यंत लढणार. आता गोळ्या घातल्या तरी मुंबई सोडणार नाही.
29 Aug 2025 10:08 AM (IST)
सरकार आपल्यााला सहकार्य करत नव्हते, म्हणून करोडो मराठ्यांनी मुंबईला जायचं ठरवलं, मुंबई जाम करायचं ठरवलं. सरकारने मोर्चाची परवानगी दिली. सरकारने सहकार्य केलं आहे, आपण ठरवल्याप्रमाणे आझाद मैदानावर आलो.कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही.
29 Aug 2025 10:02 AM (IST)
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत भगवे वादळ उसळले आहे. राज्यभरातून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाला मोठा पाठिंबा मिळत असून, आंदोलन अधिक उग्र होत आहे. यापूर्वी विरोधी पक्षातील आमदार-खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर आता सत्ताधारी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांकडूनही जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्याला साथ मिळू लागली आहे. फडणवीस सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला खुलेपणाने पाठिंबा दिला आहे.
29 Aug 2025 10:00 AM (IST)
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंतरवली सटारी ते मुंबई असा काढलेला मोर्चा आज मुंबईत दाखल झाला असून, मोठ्या संख्येने आंदोलक आझाद मैदानावर जमले आहेत.आझाद मैदान आणि सीएसएमटी परिसरात आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली आहे. 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत आंदोलनाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे.मनोज जरांगे आज सकाळी १० वाजता आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असून, त्यांच्या स्वागतासाठी हजारो आंदोलक आधीच उपस्थित झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्याची तयारी झाली आहे.दरम्यान, आझाद मैदान परिसरात एवढी गर्दी झाली आहे की पाऊल ठेवायलाही जागा उरलेली नाही. संभाव्य अनुशासनभंग टाळण्यासाठी पोलिसांनी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.
29 Aug 2025 09:59 AM (IST)
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहेत. वाशी टोल नाक्यावर हजारो गाड्यांची गर्दी झाली असून मुंबईत गाड्या दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आंदोलक सतत मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला असून पोलिस प्रशासनाकडून परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
29 Aug 2025 09:56 AM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे.
Manoj Jarange patil on maratha arakshan – मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या प्रमुख मंगणीसह मनोज जरांगे पाटील लाखो आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाने कडकडून विरोध केला आहे. तसेच त्यासाठी आंदोलन करण्याची देखील तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे. त्यांच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला आहे. त्याच संदर्भात काल नागपूरमध्ये ओबीसी महासंघाची महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये नेमके काय घडले आहे ते जाणून घेऊयात.