गरोदरपणात घ्यायची काळजी
इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात संसर्गाचा धोका अधिक वाढतो. गर्भवती महिलांना याचा सर्वाधीक धोका असतो. गर्भवती महिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय), विषाणूजन्य ताप, योनीमार्गात संसर्ग, डेंग्यू, मलेरिया, पोटाचे संसर्ग आणि कावीळ यासारखे आजार बळावण्याचा धोका जास्त असतो. गर्भवती महिलांनी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
पावसाळा हा मोठ्या संख्येने गर्भवती महिलांसाठी चिंतेचा विषय ठरतो. या दिवसात वातावरणातील आर्द्रता आणि दमटपणामुळे सर्दी आणि फ्लू सारख्या श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ होते. यामुळे खोकला, शिंका येणे आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, वाफ घेणे, विविध स्वरुपातील द्रवपदार्थांचे सेवन आणि पुरेशी विश्रांती करणे गरजेचे आहे. उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन टाळणे तसेच दुषित पाण्यामुळे देखील पोटाच्या संसर्गाचा धोका वाढतो ज्यामुळे उलट्या, अतिसार आणि निर्जलीकरण होते. या दिवसात स्ट्रीट फुड टाळणे, योग्यरित्या शिजवलेले आणि ताज्या, गरम अन्नाचे सेवन करणे, गाळून, उकळून थंड केलेले पाणी पिणे गरजेचे आहे असे पुण्यातील अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रनच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच वंध्यत्व निवार तज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी स्पष्ट केले .
Sri Sri Ravi Shankar यांनी गरोदर महिलांना दिला सल्ला, सहज पार कराल गरोदरपणाचा 9 महिन्यांचा प्रवास
काय सांगतात तज्ज्ञ
डॉ. अश्विनी राठोड पुढे सांगतात की, डेंग्यू आणि मलेरियासारख्या डासांमुळे होणारे आजार गर्भवती महिलांनाकरिता त्रासदायक ठरू शकतात. यासाठी डास प्रतिबंधक उपायांचा वापर करणे, संपूर्ण अंग झाकणारे पूर्ण बाह्यांचे कपडे घालणे आणि सांडपाण्याचा निचरा करणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे योग्य राहिल.
डेंग्यूच्या लक्षणांमध्ये तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या आणि सांधेदुखी यांचा समावेश आहे तर मलेरियामुळे ताप , थंडी वाजून येणे आणि थकवा येणे अशी लक्षणे आढळतात. टायफॉइड हा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरू शकतो आणि त्यामुळे अशक्तपणा आणि भूक न लागणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात, व्हायरल हेपेटायटीसमुळे होणाऱ्या कावीळमुळे त्वचा आणि डोळे पिवळे होऊ शकतात.
UTI सामान्य समस्या
गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाचे संसर्ग (यूटीआय) ही एक सामान्य घटना आहे आणि ती अस्वच्छता किंवा जास्त ओलावा असल्यास आणखी वाढू शकते. याकरिता श्वास घेण्यायोग्य सुती कपड्यांचा वापर करणे, भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करणे आणि स्वच्छता राखणे गरजेचे आहे.
गर्भधारणा हा एक महत्त्वाचा टप्पा असून हंगामी संसर्गामुळे तो आव्हानात्मक ठरु शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिन्यात २५-३७ वयोगटातील १० पैकी ५ गर्भवती महिलांना डेंग्यू, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन किंवा यूटीआयची समस्या आढळून येते. या आजाराचे कारण आणि लक्षणे निश्चित केल्यानंतर उपचारांची पद्धत ठरवली जाते.
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास महिला गरोदर राहू शकतात का? काय सांगतात तज्ज्ञ
स्वतःच्या मर्जीने औषध घेणे टाळा
रुग्णांना स्वतः.च्या मर्जीने औषधोपचार न करण्याचा सल्ला दिला जातो, कारण ते धोकादायक ठरु शकते. महिलांनी ताजे अन्न, स्वच्छ पाणी, डास प्रतिबंधात्मक उपाय तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे. संध्याकाळी घराबाहेर पडणे टाळा आणि घराजवळील कुंड्यांमध्ये, टायरमध्येकिंवा भांड्यांमध्ये पावसाचे पाणी साचणार नाही याची खात्री करा. कोणतीही असामान्य लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या असा सल्ला डॉ. मधुलिका सिंग, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी दिला.