विदर्भातील दक्षिण भागात पावसाची काहीशी उघडीप; पूरस्थिती कायम, जनजीवन विस्कळीतच (सौजन्य : iStock)
छत्रपती संभाजीनगर : मान्सूनच्या आगमनाला तीन ते चार दिवस शिल्लक असताना मान्सूनपूर्व पावसाचे मराठवाड्यात थैमान सुरूच आहे. बुधवारी (दि.11) जालन्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत मोठे नुकसान केले. यात एकाचा मृत्यू झाला तर शेतकऱ्यांचेही नुकसान झाले आहे. असे असताना आता सातारा, सांगली यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोल्हापुरचा घाट परिसर, सातारा, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भात पुढील दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रत्नागिरीला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारी रायगडला ऑरेंज तर शनिवारी रेड अलर्ट दिला आहे.
दरम्यान, बुधवारी राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने थैमान घातल्याचे पाहिला मिळाले. गुरुवारपासून छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार झाला. केळी व पपईच्या बागा आडव्या पडल्या, विजेचे 17 उपकेंद्रे आणि शेकडो वीजखांब कोसळले. शेतकरी उभ्या पिकांच्या नुकसानीने हताश, तर महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
अंदाजे 47 ते 51 किमी प्रतितास वाऱ्याचा वेग
संपूर्ण मराठवाड्यात बुधवारी सोसाट्याचा वारा वाहिला. वाऱ्याचा वेग अंदाजे 47 ते 51 किमी प्रतितास होता. यासोबतच विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. या पावसात कच्च्या घरचेही नुकसान झाले. पाऊस व वाऱ्यामुळे जालना व वाऱ्यामुळे जालना तालुक्यातील रेवगांत येथे नोवेल जोवेल पाखरे या 22 वर्षीय युवकाच्या अंगावर घराची भिंत पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मान्सूनपूर्व पावसाने घातला धुमाकूळ
अंदाजे 15 ते 16 जूनदरम्यान मान्सूनचे मराठवाड्यात आगमन होण्याचा अंदाज आहे. मात्र, तत्पूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. त्याच्याही आधी मे महिन्यात अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केले. एकीकडे शेतीपिकांचे, घरांचे नुकसानीची झळ शेतकऱ्यांना झाली तर दुसरीकडे वीज पडून, पाण्यात वाहून काही नागरिकांचा मृत्यूही झाला. दरम्यान, आता मान्सून लवकरच येण्याच्या तयारीत आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा हंगाम सुरु झाला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी सुरु आहे.