File Photo : Vehicle
मंगळवेढा : मंगळवेढा शहराजवळील बायपास रोडवरील दामाजी कारखान्याकडे जाणार्या चौकात एक बेकायदेशीर दारु अड्डा आहे. या ठिकाणी दारु पिण्यास वाहनचालक रस्त्याच्या मध्ये वाहने उभी करुन जात असल्याने बायपास रोडला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून अवैध धंद्यावर व वाहने उभे करणार्या चालकावर कारवाई करुन वाहतुकीस मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिक व वाहनचालकामधून पुढे येत आहे.
मंगळवेढा शहरालगत पंढरपूरहून येणारी व कर्नाटक उमदीकडे जाणारी वाहने बायपास रोडने पुढे जातात. दामाजी कारखान्याकडे जाणार्या बायपासला चौक असून, या चौकालगतच अवैध दारु विक्री करणारा अड्डा असल्याने ऊसाची वाहने व ट्रकवाले येता-जाता रस्त्यावर वाहने उभा करुन ते दारु पिण्यासाठी जात असल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याने अन्य वाहन चालक व नागरिकामधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहर बीटचे पोलीस येथून येतात- जातात मात्र त्यांना येथील बेकायदा दारु अड्डा व रस्त्यावर उभी राहिलेली वाहने दिसत नसल्याचा आरोपही नागरिकांचा आहे.
सकाळी व सायंकाळी येथूनच ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ पुरुष बायपास रोडला फिरावयास जातात. या ठिकाणी दारू पिऊन जाणारे फिरत असल्याने त्या महिला भयभीत होत असल्याचे चित्र आहे. यापूर्वी ज्येष्ठ महिलांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फोन करुन तक्रार करुनही त्यांची दखल घेतली जात नसल्याने शहर पोलिसांच्या कर्तव्यावर शंका व्यक्त केली जात आहे. जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी या कामी लक्ष घालून येथील बेकायदा दारु अड्डा हटवून रस्त्यात उभारणार्या वाहनावर कारवाई करुन येथील मार्ग सुकर करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकामधून पुढे येत आहे.
पुण्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न
पुण्यात वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी तसेच वाहतुकीचा वेग वाढविण्यासाठी पुणे पोलिसांकडून आवश्यक पावले उचलली जात आहेत. गुगलची मदत घेऊन पोलीस वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, शहरातील मुख्य 32 रस्त्यांची निवड करत या रस्त्यांवर पार्किग मॅनेजमेंट, वाहतूक नियंत्रण साधने, चौक सुधारणा असे विविध उपक्रम राबवून वाहतूकीचा वेग वाढविला जाणार आहे, यासाठी पोलिसांनी प्रसंगी कठोर पावले देखील उचलण्याची तयारी ठेवली आहे. यासाठी वाहतूक पोलीस विभाग व महापालिका एकत्रित काम करणार असून, स्वतंत्र अॅप्लिकेशन देखील तयार केले जाणार आहे.