मुंबई : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० पासून ते २४ जुलै २०२५ रात्रौ ८.३० पर्यंत ३.६ ते ४.३ मीटर तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै २०२५ रोजीचे रात्रौ ८.३० पर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह सातारा घाट, कोल्हापूर घाट भागात ऑरेंज अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कोकण किनारपट्टीवर पावसाची धुंवाधार बॅटिंग
राज्यात गेले काही दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे आणि कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मुंबई आणि उपनगरात पाऊस दरम्यान हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यात कशाप्रकारच्या पावसाचा अंदाज दिला आहे, याबाबत जाणून घेऊयात.
मुंबई, ठाणे आणि पालघरसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. जालना आणि बुलढाणा जिल्ह्यात अनके दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.
जालना जिल्ह्यात काळ जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाण ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले आहे. वाशीम जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोयना धरण परिसर या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. चिपळूण कराड मार्गाला जोडणारा कुंभार्ली घाट मार्ग देखील एका ठिकाणी खचला असल्याचे समोर येत आहे. दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.