ठाणे : हिरानंदानी ग्रुपच्या ‘र्हाईम फॉर अर्थ’ या उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी हिरानंदानी ठाणे सायक्लोथॉन 2022 (Hiranandani Thane Cyclothon 2022) मध्ये दीड हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे (Ashok Shngare) यांच्या हस्ते यावेळी दहा फूट लांबीच्या प्लास्टिकचे दुष्परिणाम दर्शवणार्या मांडणीरचनेचे (इन्स्टॉलेशन) अनावरण करण्यात आले. ठाणे येथील हिरानंदानी इस्टेट येथे हा कार्यक्रम रविवारी (2 ऑक्टोबर) रोजी पार पडला. हिरानंदानी ग्रुपच्या वतीने आयोजित ही पहिली ‘हिरानंदानी ठाणे सायक्लोथॉन’ हिरानंदानी इस्टेटच्या ठाणे येथील भव्य गृहसंकुलात झाली. त्यासाठी तब्बल दीड हजार सायकलपटू (Cyclist) सकाळी 6.30 वाजता या गृहसंकुलात एकत्रित झाले होते. त्यांनी 30, 15 आणि 5 किलोमीटर अंतराच्या सायक्लोथॉनमध्ये भाग घेतला.
[read_also content=”दसरा मेळाव्याला मर्यादा ओलांडू नका, शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला https://www.navarashtra.com/maharashtra/do-not-cross-limit-for-dasara-meleva-advice-from-sharad-pawar-to-eknath-shinde-332333.html”]
दरम्यान, शाश्वत विकासाची गरज समजून सांगण्याच्या हेतूने ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘र्हाईम फॉर अर्थ’ या व्यापक अभियानाचा ‘पॅडल फॉर अर्थ’ हा एक भाग होता. आपल्या दैनंदिन आयुष्यात बदल घडवून ते अधिक पर्यावरणस्नेही आणि स्वच्छ करण्यासाठी उचलण्यात आलेले हे पहिले कृतीशील पाऊल आहे. या सायक्लोथॉन उपक्रमाच्या उद्घाटनाला ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आवर्जून उपस्थित होते. पर्यावरण रक्षणाची गरज अधोरेखित करणे, हा ‘र्हाईम फॉर अर्थ’ अभियानाचा उद्देश आहे. अमेरिकेतील एका अभ्यासानुसार, दरवर्षी तब्बल 13 दशलक्ष टन प्लॅस्टिक समुद्रात टाकले जाते. 2050 पर्यंत हे प्लास्टिक समुद्री जलचरांपेक्षा अधिक होईल, अहे हा अभ्यास सांगतो. लान्सेटच्या अभ्यासानुसार, प्रदूषित हवेमुळे भारतात दरवर्षी एक दशलक्ष माणसे मृत्युमुखी पडतात.
निसर्गाच्या विनाशामुळे ओढवणाऱ्या वस्तुस्थितीविषयी जाणीवजागृती करणे यासाठी ‘र्हाईम फॉर अर्थ’ हा एक पुढाकार आहे. लोकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगिकारावी, यासाठी या अभियानाद्वारे जनजागृती केली जाते. याअंतर्गत ‘द वॉक’ येथे 10 फूट लांब मांडणीरचना स्थापित करण्यात आली आहे. आपण आपल्या घराबाहेर फेकलेले प्लॅस्टिक बूमरॅग झाल्याप्रमाणे किती नुकसानदायक ठरू शकते, हे लोकांना कळावे, असा हेतू यामागे आहे.
ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे म्हणाले, ‘द हिरानंदानी ग्रुपचे हे अभियान हा प्रेरणादायी उपक्रम आहे. हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवेल. अशा सकारात्मक बदलांना पाठिंबा देणे, ही आपली जबाबदारी आहे. मी या उपक्रमाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या हजारो लोकांच्या संख्येवरून हे लक्षात येते, की शाश्वत विकास, आणि पर्यावरण पूरक जीवनशैलीकडे जाण्याची त्यांची इच्छा किती प्रबळ आहे. या वाटेकडे जाण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा, सहभाग द्यावा, ही अधिकांश लोकांची इच्छा यातून स्पष्ट होत आहे. हवेतील कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल, अशा प्रकारची ऊर्जा बचत करणारी वाहनप्रणाली युवा अभ्यासकांनी शोधावी, विकसित करावी, ही अभियानाची अपेक्षा आहे.
दरम्यान, सायकलपटू फेरोजा सुरेश यांनी सायकल चालवण्याचे फायदे सांगितले. त्या म्हणाल्या की, ‘छोट्या अंतरापासून सायकल चालवणे सुरू करावे आणि अधिकाधिक लोकांनी सायकलचा वापर करावा,’ सायक्लोथॉनची सुरुवात सकाळी 6.30 वाजता झाली. सायकलपटूंच्या सुरक्षा तसेच सुरळीत वाटचालीसाठी रुग्णवाहिका, दक्षता पथके तसेच अग्निशमन दलाच्या वाहनाची सोय मार्गावर करण्यात आली होती.






