वसई । रविंद्र माने : पालक आणि अल्पवयीन मुलींमध्ये दहशत निर्माण करणारा सिरियल रेपीस्ट, सोनसाखळी चोर, हत्या, अंमली पदार्थां विरोधी कारवाई अशा केसेसे मध्ये उत्कृष्ट तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा आयुक्त मधुकर पांण्डेय यांच्या मार्फत सन्मान करण्यात आला आहे. त्यात गुन्हे शाखा २ आणि ३, मध्यवर्ती गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा, नवघर, काशिमिरा आणि विरार पोलीस हे फेब्रुवारी महिन्यातील उत्कृष्ट तपासाचे मानकरी ठरले आहेत.
एका सिरियल रेपिस्टने वसईत प्रचंड दहशत निर्माण केली होती. त्याने एका ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या सिरियल रेपिस्टचा पालकांनाही धसका घेतला होता. पोलीसांसाठी हे प्रकरण एक आव्हान ठरले होते, लवकरात लवकर त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे होते. अशावेळी कोणताही ठोस पुरावा-दुवा नसताना गुन्हे शाखा २ चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे आणि त्यांच्या पथकाने अथक परिश्रम करून सीसीटीव्हीच्या आधारे तसेच इतर तांत्रिक तपास करून आरोपीला सुरत येथून अटक केली. या कामगिरीबद्दल शाहूराज रणावरे यांना गौरविण्यात आले आहे.
दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेली होती. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील साखळी चोरण्याचे प्रकार सर्रास होत होते. मात्र, दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा हा प्रकार गंभीर आणि नवखा होता. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून तलासरी येथून अमित शनवारला अटक केली. तसेच त्याने विरार, नालासोपारा तसेच अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केलेले सोनसाखळी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी केला होता. त्याला ‘उत्कृष्ट तपास क्रमांक १’ चा पुरस्कार देण्यात आला.
भाईंदरला चोरीच्या संशयावरून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती, त्याचा मृतदेह बीपी रोड येथील शौचालयात आढळला होता. नवघर पोलिसांनी कसलाही दुवा नसताना सीसीटीव्हीच्या आधारे ६ तासांच्या आता हत्या करणार्या चौघांना अटक केली होती. या प्रकरणाची उकल करणाऱ्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी उत्कृष्ट उकल केल्याचा क्रमांक ३ चा पुरस्कार देण्यात आला आहे. तर मध्यवर्ती गुन्हे शाखा आणि काशिमिरा पोलिसांनी रिक्षा आणि मोटारसायकल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या टोळीकडून ११ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले होते. याप्रकरणी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख आणि काशिमिरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांना उत्कृष्ट उकल क्रमांक ४ च्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
गेल्या दोन महिन्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी शाखेने सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त केले होते. तसेच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. तसेच विरार पोलिसांनी २ लाखांचा गांजा जप्त केला होता. या कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अमर मराठे आणि विरार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांना सर्वोत्कृष्ट उकल क्रमांक ५ आणि ६ ने सन्मानित कऱण्यात आले आहे. पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी हा गौरव केला.