फोटो सौजन्य - सोशल मिडीया
नाशिकमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी १२ जुलै रोजी रात्री उशीरा मुंबई – नाशिक महामार्गावरील आडगावाजवळ एका ट्रक आणि कारचा विचित्र अपघात झाल्याचं समोर आलं आहे. या अपघातात कारमधील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आलं आहे. जखमींंमध्ये ट्रक चालक आणि क्लिनरचा समावेश आहे.
रहेमान सुलेमान तांबोळी (वय ४८), अरबाज चांदुभाई तांबोळी (वय २१) सीज्जू पठाण (वय ३८) आणि अक्षय जाधव (२४) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्वजण सिडको आणि इंदिरानग परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. हे सर्वजण रात्री त्यांच्या गाडीमधून ओझरकडून आडगावच्या दिशेने जात होते. त्यांची गाडी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव येथील दत्त मंदिरासमोर आली असता त्यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली.
हा ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून ओझरच्या दिशेने जात होता. याचवेळी अचानक ट्रकचा टायर फुटला. ट्रक दुभाजकावर चढून थेट विरुद्ध बाजूच्या दिशेने येणाऱ्या कारवर आदळला. या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ट्रक चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या भीषण अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अपघातामुळे महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून बाजूला केली, त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळित झाली.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दोन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये बसच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. १० जुलै रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास नाशिकरोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपोमध्ये ही अपघाताची घटना घडली. बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई (वय ५) आजोबांसोबत शाळेतून चहा टपरीवर जात होती. यावेळी सिटीलींक बस चालकाने भरधाव वेगाने तिला मागून धडक दिली. या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या आजोबांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गवई कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या अपघाताच्या घटनांनी संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे.