मंगळवेढा : आषाढीच्या (Ashadhi Wari 2022) पार्श्वभूमीवर सावळ्या विठ्ठलाचा भक्त श्री संत दामाजीपंताच्या दर्शनासाठी महिलांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केल्याने मंदिराच्या गाभार्यापासून ते चौकातील श्री संत दामाजी पंताच्या पुतळ्यापर्यंत लांबलचक महिलांच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भाविक दर्शनासाठी येतात. विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाचा भक्त म्हणून ओळख असलेल्या श्री संत दामाजीपंताच्या पायावर डोके ठेवल्याशिवाय भाविक परतत नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. परिणामी, दामाजीपंतांचे मंदिर दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी फुलून गेले होते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे वारी होवू शकली नाही. आतुर झालेल्या भाविकांनी यंदा मोठी गर्दी केली आहे.
मंदिरातील गाभार्यापासून ते चौकातील दामाजीपंताच्या पुतळयापर्यंत लांबलचक कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी रांगा लागल्याचे पाहून मंगळवेढेकर आश्चर्य व्यक्त करत होते. ट्रस्टीने भाविकांच्या फराळाची सोय केल्याने भाविकांनी प्रसाद घेवून समाधान व्यक्त केले.
आतापर्यंत कर्नाटक राज्यातील पंढरपूरकडे जाणार्या दिंड्याही या मंदिरात विसावल्या होत्या. आषाढी एकादशीनिमित्त संध्याकाळी भजन, किर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मंगळवेढात १८ संत होवून गेल्याने राज्यातही एक पवित्र भूमी म्हणून पाहिले जाते. दामाजीपंत, चोखामेळा, कान्होपात्रा हे विठ्ठलाचे खरे भक्त म्हणून ओळख आहे. येथील किल्ल्याचा बुरूज कोसळल्यानंतर चोखोबारायांचा अंत झाला.
यावेळी त्यांना ओळखणे अवघड बनल्याने त्यांच्या अस्थी कानाला लावले असता त्यामधून विठ्ठल…विठ्ठल…नामाचा गजर ऐकावयास आल्याने हाच मृतदेह चोखोबाचा असल्याचे गृहित धरण्यात आल्याचा इतिहास आहे.
एवढी निष्ठा पांडुरंगावर या संतांची होती. त्यामुळे प्रत्येक भाविक या भुमीत आल्यानंतर त्यांचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नसल्याचा अनुभव नागरिकामधून कथन केला जातो आहे.