जालना : “आता मी एकटा पडलोय, मला एकटे पाडण्यासाठी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी मराठ्याच्या पोरांसाठी लढतोय, समाजासाठी लढतोय. मराठा समाजाने तरी माझ्या मागे उभे राहा, आता मराठ्यांच्या नेत्यांनी एकजूट व्हा, मराठा समाजही तुम्हाला उघडे पडू देणार नाही, मग तुम्ही कोणत्याही पक्षातील असलात तरी एक़जूट व्हा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला.
राज्यात जे काही चाललेय ते छगन भुजबळ यांनी सुरू केलं आहे. आम्ही जातीवाद करत नाही, जातीवाद त्यांनी सुरू केलाय,” असा घणाघात मराठा उपोषकर्ते मनोज जरांगे यांनी केला आहे. जरांगे म्हणाले, “हा माणूस जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा माणूस मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे मराठा समाजाच्या जिवावर सत्तेत येणाऱ्या ओबीसी नेत्यांचे खरे चेहरे समोर आले, त्यांची सत्यता बाहेर आली.”
“सगळ्या पक्षातील ओबीसी नेते मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून एकवटले आहेत. ते नेते मतांचा नाही आरक्षणाचा विचार करत आहेत आणि मराठा नेते आरक्षणाचा नाही तर मतांचा विचार करत आहेत. हा त्यांच्या आणि आमच्या नेत्यांमंध्ये फरक आहे.
आरक्षण किती मोठा विषय आहे हे लक्षात येते भाजपमधील सर्व ओबीसी नेते, अजित पवार यांच्या गटातील ओबीसी नेते, शिंदे गटातील ओबीसी नेतेही एकत्र झाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस या पक्षातीलही सर्व नेते एक झाले. सगळे ओबीसी नेते एकवटले, मग मराठा समाजातील नेत्यांनाही हे कळत नाही का, त्यांच्यासाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे. ते पद आणि मतांपेक्षांही आरक्षणाला महत्त्व देत आहेत.
माझी मराठा समाजाला विनंती आहे. 6 जुलैपर्यंत सर्व मराठ्य़ांनी आपापली कामे उरकून घ्या, 6ते 13 जुलै दरम्यान आपण जी शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे यारॅलीला सर्व मराठ्यांनी उपस्थित राहा. डोळ्यांदेखत मराठ्यांच्या लेकरांचे वाटोळे होऊन देऊ नका. 6 जुलैला एकही मराठा घरी राहणार नाही. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये या रॅली ठेवण्यात आल्या आहेत. त्या दिवशी कोणीही घरी बसणार नाही, कोणाच्या लग्नाला जाणारनाही. सर्वांनी या रॅलीत हजर राहायचे आहे. असे आवाहन यावेळी जरांगे यांनी केले.