'मी म्हातारा झालेलो नाही'; 'सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही' - शरद पवार
महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याभोवती फिरते. अगदी मग ती लोकसभा निवडणूक असो की मग विधानसभा निवडणूक असो… राजकारणातील चाणक्य म्हणून ओळख असलेले शरद पवार हे बाजू पलटल्याशिवाय राहत नाही. पाच महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही शरद पवार या नावाचा करिश्मा दिसून आला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला चांगलाच धक्का दिला. अशातच आता विधानसभा निवडणुकीत देखील शरद पवार हे महाविकास आघाडीच्या चांगल्या जागा खेचून आणतील. असे त्यांच्या आजच्या भाषणातून दिसून आले आहे.
वयाच्या मुद्द्याचा घेतला खरपूस समाचार
राष्ट्रवादीचे (शरद पवार घट) जेष्ठ नेते शरद पवार हे आज धाराशिव येथे जाहिर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांकडून वारंवार आपल्या काकांच्या वयाचा उल्लेख केला जातो. त्यांना निवृत्तीची साद घातली जातेय. मात्र, पवार यांनी आपल्या वाढत्या वयाचा मुद्दा लिलया टोलवला आहे. इतकेच नाही तर त्यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे की, मी अजून म्हातारा झालेलो नाही. सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी आज धाराशिवमधील सभेतून दिला आहे. त्यामुळे आता भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांना धडकी बसल्याशिवाय राहणार नाही.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
हेही वाचा – महाराष्ट्र निवडणूक 2024: महायुती की महाविकास आघाडी;कोणाचा जाहीरनामा सर्वात प्रभावी?
राज्यातील सत्ता बदलण्याचा निर्धार
विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार राज्यभर दौरे करत आहेत. अशातच आज खासदार शरद पवार यांनी धाराशीवमधील परांडामध्ये जाहीर सभा घेतली. परांडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारासाठी आयोजीत केलेल्या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी महायुतीवर निशाणा साधला आणि राज्यातील सत्ता बदलणार असल्याचा निर्धार केला.
भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांना धडकी भरणार
दरम्यान, मागील महिन्यात फलटणमधल्या सभेतही त्यांनी 84 च काय 90 वर्ष झाले तरी हे म्हातारा काही थांबणार नसल्याचे विधान केले होते. आपण महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार पवारांनी व्यक्त केला होता. अशातच आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी राज्यातील सत्ताबदलाचा निर्धार बोलून दाखवल्याने भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांना धडकी बसल्याशिवाय राहणार नाही.
पाच दशकांपेक्षा जास्त राजकीय अनुभव असलेल्या पवारांना महाराष्ट्र तोंडपाठ आहे. यापूर्वीही अनेक धक्के पचवून ते निर्धाराने सत्तेत आले आहेत. स्वत: स्थापन केलेला पक्ष फुटल्यानंतरही ते खचले नाहीत. तरुणांना लाजवेल अशा उर्जेने ते प्रचाराला उतरले आहे. त्यामुळे लोकसभेसारखाच विजय ते विधानसभा निवडणुकीतही मिळवणार का? याकडेच संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.