ऐन निवडणुकीत ठाकरे सेनेचा भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा
विधानसभा निवडणुकांचा प्रचार राजकीय पक्षांकडून जोमात सुरू असून मतदानाची तारिखही जवळ येत आहे. मात्र त्याआधी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव सेनेच्या जतच्या युवासेनेने भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला. काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याने गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन जत मतदारसंघात पाठिंबा देत असल्याचं युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
सांगली जिल्ह्यातील सांगली, जत, खानापूर मतदारसंघात बंडखोरी झाली असून अन्य ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. जिल्ह्यातील आठही मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झाले असून पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मार्ग सुकर झाला असून जतमध्ये महायुतीला तर सांगली, खानापूरमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. सांगली मतदार संघातून महायुतीचे आ. सुधीर गाडगीळ, महाविकास आघाडीचे पृथ्वीराज पाटील व काँग्रेसच्या बंडखोर जयश्री पाटील यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
जतमध्ये भाजपचे प्रचार प्रमुख तमणगोंडा रवि पाटील यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने महायुतीचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. भाजपअंतर्गत विरोधकांनी रवि पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून या ठिकाणी काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांना भाजपचे आमदार पडळकर व बंडखोर रवि पाटील यांच्याशी कडवी लढत असणार आहे. खानापूर मतदारसंघातून राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, वैभव पाटील यांना आघाडीतून संधी देण्यात आली. त्यामुळे देशमुखांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांची उमेदवारी कायम असल्याने या ठिकाणी महायुतीतील शिवसेना (शिंदे) पक्षाचे सुहास बाबर, महाविकास आघाडीचे वैभव पाटील आणि अपक्ष देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे.
हेही वाचा-Nagpur: “मतांसाठी काँग्रेसला जातीचं राजकारण फक्त करता येतं”, परिणय फुके यांची सणसणीत टीका
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जतमध्ये अचणीत असताना उद्धव ठाकरे यांच्या युवासेनेने पाठिंबा दिल्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. शिवसेना ठाकरे गटाला आणि महाविकास आघाडीला ऐन निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जत युवासेनेने भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना पाठिंबा दिला. काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याचं सांगत त्यांना आज गोपीचंद पडळकर यांची भेतली आणि जत मतदारसंघात पाठिंबा देत असल्याचं युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं. त्यामुळे जतमध्ये उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या १० दिवसांवर निवडणूक असल्यामुळे याचा कोणाला फायदा होता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.