Photo Credit- Social Media
मुंबई: महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या भाजप आणि विरोधी महाविकास आघाडीने आज (10 नोव्हेंबर) आपापले निवडणूक जाहीरनामे प्रसिद्ध करत 100 दिवसांचा अजेंडा मांडला. भाजपने सक्तीच्या धर्मांतराच्या विरोधात कायदा आणण्याचे जाहीर केलं, तर MVA ने जात जनगणनेचे आश्वासन दिलं आहे.
भाजप आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला आणि तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दोन्ही जाहीरनामे महिला, शेतकरी आणि तरुणांना काय मिळणार आणि दोन्ही बाजूंच्या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने देण्यात आली आहेत, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हेही वाचा: हिंदूंवरील हल्ल्यामुळे बांगलादेश सरकार अडचणीत; 800 पानांचा दस्ताऐवज आंतरराष्ट्रीय न्यायालयात
भाजपने 2027 पर्यंत 50 लाख लखपती दिदी तयार करण्याचे आश्वासन दिले असून महिलांना आर्थिक साक्षरता देण्याचेही जाहीर केलं आहे. या अंतर्गत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्यात येणार असल्याचेही महायुतीने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर महायुतीचे सरकार आल्यावर महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात 25 हजार महिलांचा समावेश केला जाणार असल्याचे म्हटले आहे.
तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सरकार आल्यावर महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाईल. महिलांना 500 रुपयांमध्ये वर्षभरात सहा गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शक्ती कायद्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस 9 ते 16 वर्षे वयोगटातील मुलींना मोफत दिली जाईल, असेही आश्वासन या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. तर मासिक पाळीत 2 दिवसांच्या रजेची तरतूद करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: RSS, Hindu Politics: आरएसएसची स्पेशल 65 टीम मैदानात; हिंदूंना एकत्रित करण्यासाठी मोठा
किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 15 हजार रुपये देणार असल्याचे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफीही केली जाणार आहे. 20 टक्क्यांपर्यंत रूपांतरण योजना एमएसपीच्या समन्वयाने लागू केली जाईल.
त्याचवेळी महाविकास आघाडीने कर्जमाफीचे आश्वासनही दिले आहे. 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे आश्वासही महाविकास आघाडीने दिले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, पीक विमा योजनेतील अटी काढून टाकून ते विमा योजना सुलभ करण्याचे वचन महाविकास आघाडीने दिले आहेत.
हेही वाचा: “बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करण्याचं धाडस आहे का?” पंतप्रधान मोदींचं काँग्रेसला आव्हान
भाजपने महाराष्ट्रातील तरुणांना 25 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे आणि 10 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 10,000 रुपये मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच वेळी, एमव्हीएने पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना 4,000 रुपयांपर्यंत मासिक भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच अडीच लाख जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा संकल्प केला आहे.






