सुधाकर बडगुजर यांच्या भाजपप्रवेशावर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं मोठं विधान; 'बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल...' (संग्रहित फोटो)
नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असे म्हटले जात आहे. यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांच एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही’, असे त्यांनी म्हटले आहे.
नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. त्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावर सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला नाशिकच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते. त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे.
दरम्यान, सध्या पावसाळा सुरू झाला असून, उन्हाळी पिकांचं पावसामुळे नुकसान झालं आहे. बागायती पिकांचंही नुकसान झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी मागील कॅबिनेटमध्ये आढावा घेतला होता. आजच्या कॅबिनेटमध्ये आढावा घेतला जाईल. झालेली नुकसान भरपाई करण्यासाठी शासन पुढाकार घेईल. लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई करून दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
वन्य प्राणी त्रास
वनक्षेत्राला लागून असलेल्या जमिनी बफर झोनमध्ये असलेल्या जमिनी शेतकऱ्यांकडून 50 हजार रुपये एकरी या दराद्वारे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत आम्ही घेणार आहोत. तिथे बांबूची लागवड ग्रासलँड डेव्हलपमेंट केलं जाणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार होणारे शेतकरी शेतमजूर यांच्या जीव वाचेल. लवकरच याचा जीआर येणार आहे. सर्व बफर झोन जमिनी आम्ही भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.