Photo Credit : Team Navrashtra
मुंबई: ईडी,सीबीआयची हत्यारे अंगाला लावून आमच्या अंगावर येऊ नका, तुमच्यात दम असेल ना ईडी,सीबीआय बाजूला ठेवा मग आम्हीपण बघतो. महाराष्ट्र काय आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिले आहे.
रविवारी (21 जुलै) पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात बोलताना, आज तुम्हाला परवानगी देतो. ज्याला बॅटिंग करायची आहे, त्याने करावी. बाकी आदेश विचारू नका. मैदानात उतरा आणि ठोकून काढा, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.त्यांच्या या विधानाला राऊतांनी ईडी, सीबीआयची हत्यारे बाजूल ठेवून आणि राजीनामा देऊन मैदानात या, मग आम्ही दाखवतो, अशा शब्दांत उत्तर देत त्यांना खुले आव्हान दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, ‘काल गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते, महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे. एका गुंडाची भाषा वापरत आहेत. रस्त्या-रस्त्यावर गुंडगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत आणि आपण म्हणताय ठोकून काढा, म्हणजे हा पराभव तुमच्या इतका आरपार गेला आहे का? आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र फडणवीस आणि अमित शहांची अशी भाषा सहन करणार नाही. तुम्ही गृहमंत्री असतानाही ठोकशाहीची भाषा करताय, मग अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि ही भाषा करून दाखवा, मग ठोकशाही काय आहे, हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल.
यांच्याच डोक्यात औरंगजेब आहे, यांनाच निवडणुका जिंकण्यासाठी औरंगजेब हवा आहे. यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्सक्लब सुरू केलेत. यांना हिंदू-मुसलमानांमध्ये दंगली घडवायच्या आहेत. म्हणून यांच्याच तोंडात औरंगजेब आहे, आमच्या नाही. असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रातला पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारातही अमित शहांनी शरद पवार,उद्धव ठाकरेंवर आरोप केले. आता त्यांना औरंगजेब फॅन्सक्लबचा प्रमुख म्हणून टीका केली. पण तरीही महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा दारूण पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली. पण गुजराती व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही हा संदेश लोकसभ निवडणुकीच्या निकालाने अमित शहांना दिला आहे. आणि ते आता त्याचा आक्रोश करत आहेत.
‘शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब हे दोघेही महाराष्ट्राच्या राजकारणातीस सन्माननीय व्यक्ती आहेत. आम्ही भाजपसारख्या खोटारडेपणाच्या मशीन लावून काम करत नाही. ईव्हीएम चे घोटाळे करून, निवडणूक रोख्यांचे, ईडी,सीबीआयचे घोटाळे करून आम्ही जिंकत नाही. आम्हाला स्पष्ट आणि स्वच्छ मार्गाने विजयी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.