वाहनचालकांनो, तुमच्या वाहनावर FASTag लावून घ्याच; अन्यथा दुप्पट भरावा लागणार टोल (File Photo : Toll)
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारितील टोल नाक्यांवर फास्टॅगद्वारे टोल भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर वाहनांवर फास्टॅग नसेल तर तुम्हाला तुमच्या वाहनांसाठी दुप्पट टोल भरावा लागणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून (दि.1) सुरु केली जात आहे. त्यानुसार, टोलनाक्यांवरील सर्व मार्गिका फास्टॅगमध्ये रुपांतरित करण्यात आल्या आहेत.
एमएसआरडीसीमार्फत टोलनाक्यांवर फास्टॅगच्या जोडीला हायब्रीड पद्धतीनेही टोल वसुली केली जात आहे. त्यामुळे दोन मार्गिका हायब्रीड पद्धतीच्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोख, स्मार्ट कार्ड, पीओएस, डेबिट कार्ड, क्यूआर कोड यांच्या माध्यमातून टोल स्वीकारला जात होता. मात्र, आता आजपासून या हायब्रीड मार्गिका बंद करुन सर्व मार्गिका फास्टॅग मार्गिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीमार्फत टोल वसुली होणाऱ्या नऊ रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व टोल नाक्यांवर केवळ फास्टॅगमार्फतच टोल वसूल केला जाणार आहे.
दरम्यान, फास्टॅग न वापरणाऱ्या वाहनधारकांना दुप्पट रोख रक्कम द्यावी लागणार आहे. हा निर्णय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) निश्चित केलेल्या धोरणांशी आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशाशी सुसंगत असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुमच्या कारला फास्ट टॅग लावणे बंधनकारक असणार आहे. जर तुम्ही रोख, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर तुम्हाला टोलचे पैसे डबल भरावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
हलक्या वाहनांसह स्कूल बसला टोलमाफी
मुंबईत हलक्या वाहनांना, शाळेच्या बसला टोलमाफी आहे. त्यानुसार, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील पाचही टोल नाक्यांवर या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका असून, तेथे फास्टॅग प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई, एमएमआरमध्ये प्रवास करणाऱ्या वाहनांपैकी अनेक वाहनांना फास्टॅग नसण्याची शक्यता आहे. पण यापुढे त्यांनाही फास्ट टॅग प्रणालीशी खाते जोडावे लागणार आहे.