लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू करण्यात आली. राज्यात पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या कामासाठी जिल्ह्यातील शिक्षण, कृषी, महसूल, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महापालिकेमधील जवळपास २२ ते २५ हजार कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र अनेक कर्मचाऱ्यांकडून इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी विनंती पत्र देण्यात आले आहे.
इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी विनंती अर्ज
इलेक्शन ड्युटी लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घरात सासू-सासरे किंवा आई-वडील वयस्क असून त्यांच्याकडे लक्ष देणार कोणी नाही. त्यांना वेळेवर औषध द्यावी लागतात. तर अनेकांनी सांगितले उन्हाचा तडाखा जास्त आहे. तो सोसवत नाही. काही जण गंभीर आजारातून आत्ताच बरे झाले आहेत, अजूनही त्रास जाणवत असल्याने इलेक्शन ड्युटी रद्द करावी, असे लिहत पत्राद्वारे विनंती केली आहे.
लोकसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक राहिले असताना जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीच्या काळात कामकाजासाठी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण ६ ते ९ एप्रिल दरम्यान पार पडले.
तर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण एप्रिल अखेरमध्ये पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणावेळी इलेक्शन ड्यूटी रद्दची संधी दिल्याने अनेकांनी अर्ज करत विनंती केली आहे. तहसीलदार, प्रातांधिकारी (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी) यांच्याकडे अर्ज दाखल केले आहेत. घरातील किरकोळ कारणामुळे इलेक्शन ड्युटी रद्द केल्याचे अर्ज केल्यानंतर त्यांचे पाहून अनेकजण तशी मागणी करू लागतील, अशी खात्री प्रशासनाला देखील आहे. त्यामुळे शक्यतो कोणाचीच इलेक्शन ड्युटी रद्द करायची नाहीअसे आदेश देण्यात आले आहेत. सोलापूर व माढा या मतदार संघात निवडणुकीसाठी तीन हजार ६१७ मतदान केंद्रे बनवण्यात आले आहेत. त्यातील प्रत्येक केंद्रावर किमान ५ कर्मचारी असून इतर काही अतिरिक्त कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी आदेश देण्यात आले आहेत.