विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता (फोटो सौजन्य - istock)
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबई, पुणे, कोकणात देखील पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात नागरिकांचं जनजीवन विस्तळीत करणाऱ्या पावसाने आता उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळला असून शेतीच्या कामांना देखील वेग आला आहे. पण आज विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर हवामान विभागाने गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
हेदेखील वाचा- लोको पायलटच्या केबिनमध्ये घुसून रील बनवणं पडलं महागात, नाशिकमधून 2 रीलस्टार अटकेत
विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाट पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच गोव्यातील बहुतांश ठिकाणी आज व उद्या पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान, कोकण गोव्यात, विदर्भात, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भाच्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वर्धा, यवतमाळ येथे १५ व १६ ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेदेखील वाचा- जगातील सर्वात गरीब देशांमध्ये भारताचं नाव कोणत्या क्रमांकावर येतं माहिती आहे का? जाणून घ्या
पुढील पाच दिवस कोकणातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात आज व उद्या ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर पुण्यातील घाट विभागात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाने घाट परिसरात यलो अलर्ट दिला आहे.
जून अखेरपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असली तरी जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आतापर्यंत राज्यात १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. दरवर्षीच्या टक्केवारीप्रमाणे ऑगस्ट महिन्यापर्यंत राज्यात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. परतुं यंदा राज्यातील काही भागांत दमदार पाऊस बरसून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदा राज्यात ७९२.८ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पावसामुळे राज्यातील सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची चिंता देखील मिटली आहे.