राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो- ai gemini)
पावसाने पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा
पुणे जिल्ह्याच्या घाट विभागाला ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण
सुनयना सोनवणे / पुणे: मंगळवारी रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसाने पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला. शहरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, दक्षिण-पश्चिम मान्सूनने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उर्वरित भागांमध्ये आगेकूच करत बुधवारी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. मान्सूनच्या वाढत्या सक्रियतेमुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागाला ऑरेंज, तर शहरासह उर्वरित जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या मध्य प्रदेशातील चक्रीय स्थितीपासून पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवामानाची द्रोणीय रेषा विस्तारलेली असल्याने राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुणे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरात अधिकृतरीत्या मान्सून दाखल झाल्यानंतर मंगळवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. रात्रभर सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते, उद्याने आणि परिसर ओलाचिंब झाले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला. पुढील तीन ते चार दिवस शहरात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी यलो अलर्ट, तर घाट विभागाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाच्या आगमनामुळे शहरातील कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कमाल तापमानात तब्बल पाच ते सहा अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. बुधवारी शहराचे कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर शहरातील काही भागांत तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या.
पुणे आणि परिसरात गुरुवारी (ता. २५) कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसभर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस मान्सून आणखी सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी वीजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…
‘मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर गेल्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. पुढील काही दिवस मान्सून सक्रिय राहण्यासाठी वातावरण अनुकूल असून कोकण व घाट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहू शकतो.’
-डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
पावसाची नोंद (मिमी) – ता. २४
पाषाण – ८.०
शिवाजीनगर – ४.७
एनडीए – ४.५
गिरीवन – ३.५
चिंचवड – २.०
दापोडी – १.५
निमगिरी – ०.५
लवळे – ०.५
तालुकानिहाय जूनमधील पर्जन्यमान (मिमी)
( २४ जून २०२६ अखेर)
तालुका – पर्जन्यमान (मिमी)
पुणे शहर – १५२.९
हवेली – १७५.५
मुळशी – २७८.६
भोर – २०५.५
मावळ – वडगाव – २२४.६
वेल्हे – ४६५.२
जुन्नर – ११५.४
खेड -राजगुरुनगर – १२७.१
आंबेगाव. – १३४.३
शिरूर – घोडनदी – ९०.१
बारामती – ८७.१
इंदापूर – १०२.१
दौंड – ९४.५
पुरंदर सासवड – ११२.३






