सौजन्य - नवराष्ट्र टीम
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नॅशनल हेराल्ड ही कंपनी स्वातंत्र्य़ चळवळीच्या वेळी ब्रिटिशांविरोधात लढताना एक अजेंडा चालवण्यासाठी देशप्रेमातून स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थेच्या स्थापनेसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतः पैसे दिले होते. ही संस्था एक वर्तमान पत्र चालवत होती व ना नफा तत्वावर या संस्थेचे काम चालत होते व आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात या संस्थेत काम करणाऱ्या पत्रकार, कर्मचारी यांचे पगार देण्याचा प्रश्न उद्भवला तेव्हा काही व्यवहार झाले पण त्यातून कोणत्याही सभासदाला लाभांश वगैरे आर्थिक लाभ झालेला नाही. पण मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप करत भाजपाने खोटे गुन्हे दाखल करण्यास तपास यंत्रणाना भाग पाडले. सोनिया व राहुल यांना तासनतास चौकशीच्या नावाखाली त्रास देण्यात आला. आज भाजपाचा खोटेपणा उघड झाला आहे, असेही सपकाळ म्हणाले.
मंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा – सपकाळ
महायुती सरकारमधील क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्याप्रकरणी २ वर्षांची शिक्षा जिल्हा न्यायालयानेही कायम ठेवली आहे पण सरकार कोकाटेंना वाचवण्यासाठी आणखी संधी देईल. राहुल गांधी व सुनिल केदार यांना शिक्षा होताच २४ तासात त्यांची खासदारकी व आमदारकी रद्द केली होती पण माणिकराव कोकाटेंना मात्र सरकार वाचवत आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांना एक न्याय व विरोधी पक्षातील लोकांना दुसरा न्याय लावला जात आहे. सरकारने तात्काळ माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करावी, अशी मागणी सपकाळ यांनी केली.






