फलटण : श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) असा २,१०० किलोमीटरच्या रथ व सायकल यात्रेचे पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राजभवनमध्ये स्वागत केले. यावेळी उपस्थित भाविकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करीत आनंद सोहळा साजरा केला.
भागवत धर्माचे ज्येष्ठ प्रचारक, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५३ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२७ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५४ व्या जयंतीनिमित्त भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ आणि श्री नामदेव दरबार कमिटी घुमान (पंजाब) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नामदेव महाराज यांची श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमान अशी रथ व सायकल यात्रा काढण्यात आली होती. शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार-प्रसार करीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली व हरियाणा राज्याचा प्रवास करीत ही यात्रा शनिवारी पंजाब राज्याची राजधानी चंदिगड येथे पोहोचली. राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी यात्रेचे स्वागत केले.
या यात्रेत सर्व वयोगटातील सुमारे शंभर सायकलयात्री सहभागी झाले आहेत. या स्वागत समारंभास भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, खजिनदार मनोज मांढरे, दत्तात्रय पवार, चंद्रकला भिसे, नामदेव दरबार कमिटीचे सरपंच नरिन्द्र सिंह निंदी, अध्यक्ष तरसेम सिंह बावा, महासचिव सुखजिन्द्र सिंह बावा, उप सचिव मनजिन्द्र सिंह बावा, प्रेस सचिव सर्बजीतसिंह बावा यांच्यासह सायकल यात्री उपस्थित होते. ही यात्रा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीदिन सोहळ्याच्या दिवशी म्हणजे दि. ११ रोजी श्री क्षेत्र घुमाण येथे पोहोचेल. दि १२ डिसेंबर रोजी सायकल यात्रेची सांगता होणार आहे.
देश जोडण्यासाठी यात्रा उपयुक्त
राज्यपाल बनवारीलाल म्हणाले, भारतीय संस्कृती जतन करण्याचे व जोपासण्याचे काम तुम्ही करीत आहात. नव्या पिढीला संतांचे विचार देवून तुम्ही त्यांना प्रवृत्त तुम्ही करत आहे, तुमची ही निस्वार्थ सेवा असून भागवत धर्माचा प्रचार व प्रसार हे मोठे काम आहे आणि ती काळाची गरज आहे. ही यात्रा देश जोडण्यासाठी उपयुक्त आहे. ते तुम्ही करीत आहात ही अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.