Photo Credit- Social Media (संगमनेरमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या कानाखाली लगावली)
संगमनेर: राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संगमनेरचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील वादामुळे संगमनेरमध्ये मोठा वाद उफाळून आला होता. हा वाद ताजा असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या गटाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी भाजपचे शहर प्रमुख ॲड. श्रीराम गणपुले यांच्या श्रीमुखात लगावल्याचा प्रकार संगमनेर शहरात घडला. यामुळे समंगनेरमध्ये वातावरण चांगलेच तापले होते.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी शहर पोलीस ठाण्याच तक्रार दाखल करत दोषींना तात्काळ अटक कऱण्याची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी विखे -पाटील संगमनेरमध्ये आले होते. अर्ज दाखल करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दीही केली होती. नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाताना खताळ आणि गणपुले हेदेखील त्यांच्या सोबत होते. अर्ज दाखल झाल्यानंतर मंत्री विखे पाटील निघून गेले. त्यानंतर महायुतीचे कार्यकर्तेही आपापल्या वाटेने निघून गेले.
हेही वाचा: भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम
गणपुले चहा पिण्यासाठी एका चहाच्या दुकानात थांबले होते. त्याचवेळी मागून येऊन कतारी यांनी गणपुले यांच्या थेट कानशिलात लगावली. कानशिलात लगावल्यामुळे गणपुले यांच्या कपड्यावर चहा सांडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महायुतीचे कार्यकर्ते त्याठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले होते. या घटनेची माहिती मिळताच विखेपाटील पुन्हा त्याठिकाणी आले. त्या सर्वांनी थेट पोलीस ठाणे गाठत कतारींविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली.
पण गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्या सुरू असलेल्या वादातून आजचा प्रकार घडल्याचे काहींचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये बऱ्याच दिवसांपासून किरकोळ वाद सुरू होते. पंधरा दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरही त्यांच्याती मतभेद उफाळून आले होते. त्याच वादातून आजची घटना घडल्याचे सांगण्यात येतआहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेत या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पण सुजय विखे- पाटील आणि जयश्री विखे पाटील यांच्यातील वाद ताजा असतानाच हा प्रकार घ़डल्याने संगमनेरच्या राजकारणात अधिकच भर पडली आहे.