Photo Credit- Social Media भारताने सिंधू नदीचं पाणी बंद केलंच नाही..; प्रकाश आंबेडकरांनी ते पत्रच दाखवलं
शिर्डी : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे ५ महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये पाकिस्तानच्या पाण्याची कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला (Indus Water Treaty) स्थगिती दिल्याचे घोषित केले. मात्र, २४ एप्रिल रोजी केंद्रीय सचिवांनी पाकिस्तानला लिहिलेल्या पत्राचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताने पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं नाही आणि सरकार खोटं बोलतंय, दिशाभूल करत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले असून, अटारी वाघा बॉर्डर १ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. परंतु, हा करार रद्द केल्याचं खोटा असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यानी केला आहे. पाकिस्तानला पाणी बंद करण्यासंदर्भातील दिलेल्या पत्राचा उल्लेख करत या पत्रात कुठेही पाणी बंद करण्याचा उल्लेख नाही. याचाच अर्थ, इंडस करार भारत सरकारने रद्द केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, माझ्या भाषेत नरोबा कुंजोबा आणि कायद्याच्या भाषेत स्टेटस्को अस हे पत्र आहे. जर हे पत्र जनतेसमोर आले तर सरकार कुठल्या प्रकारची कारवाई करत आहे, हे सत्य बाहेर येयईल. पण हा गंभीर मुद्दा असून शासनाने याकडे डोळे झाक करू नये. यामाध्यमातून फक्त देशभरातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना बाहेर काढले जात आहे. एवढीच वस्तूस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले.
सिंधू जल कराराबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले की, कोणताही करार थेट रद्द करणे सोपे नसते., त्यासाठी विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. पण जर केंद्र सरकारने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्यावर संबंधित अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पाकिस्तानला माहिती आहे की, भारत पाणी थांबवू शकत नाही. त्यामुळेच, पाकिस्तानचे नेते भारताला चिथावणी देत आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तान लष्कराच्या चीफने केलेलं भाषणात त्याने टू नेशन थेअरी मांडली होती. ज्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी याबाबत सरकारला माहिती दिली त्यावेळी सरकार मात्र झोपलं होत. त्यावेळी सरकारने सैन्याला कोणत्याही सूचना दिल्या नाही. आता इस पार.. या उस पार, असं सांगत आज आपलं सैन्य पूर्णपणे तयार आहे. पण देशातील केंद्र सरकारलाच ती इच्छा दिसत नाही. त्यामुळे, सरकारमध्ये इच्छाशक्ती यावी यासाठी आम्ही 2 मे ला हुतात्मा स्मारकासमोर आपण निदर्शने करणार असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.