राजापूर : लोकसभा निवडणूकीमध्ये राजापूर विधानसभा मतदार संघातील मतांचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून त्याद्वारे भारताचा भव्य नकाशा साकारत मतदान जनजागृती केली. यावेळी पथनाट्य, मतदान प्रतिज्ञेद्वारेही जनजागृती करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली माने यांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले.
लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या असून यामध्ये राजकीय पक्षांसह उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. त्यातून, निवडणूकीची वातावरण निर्मिती झाली आहे. या निवडणूकीसाठा होणार्या मतदानाची पूर्वतयारी करण्यामध्ये प्रशासन गुंतले आहे. त्याचवेळी गतवेळीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असून त्यासाठी विविध उपक्रमही राबविले जात आहेत. त्यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती माने यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती करणारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर विविध उपक्रम पार पडले.
तहसिलदार शितल जाधव, गटशिक्षणाधिकारी उत्तम भोसले, महूल विभागाचे मंडल अधिकारी बाजीराव पाटील यांसह मोठ्यासंख्येने शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारीवृंद उपस्थित होते. त्यावेळी शहरातील हायस्कूलसह जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थींनी एकत्रित येत मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा साकारत सार्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सुभाष चोपडे, प्रविण किंजळस्कर, संदीप परटवलकर, गणेश वाले, सुनिल भांडेकर, मानसी सुर्वे, समिधा कोलते, शुभांगी सागरे, मनिषा नागरगोजे, प्रिया किंजळस्कर, सुदर्शन घागरे, रविंद्र लाड आदी सहभागी शिक्षकांनी मतदार जनजागृतीसाठी सादर केलेल्या पथनाट्याने सार्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी बोलताना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती माने यांनी सार्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे .