छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांना फसवले. त्यामुळे मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईच्या दिशेने कूच करावी लागली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली मराठा आरक्षणाबाबतची शप्पथ खोटी ठरते काय अशी शंकाही आमच्या मनात आता निर्माण होऊ लागली आहे. मात्र, आरक्षण देण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि सरकारची आहे, असे वक्तव्य ठाकरे सेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ येथे केले.
उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये वाढली
यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची महापत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असीम सरोदे यांनी मांडलेली बाजू पाहता महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना लोकांमध्ये वाढू लागली. याच पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई करण्यात आली आहे. आम्ही या कारवाईला भीक घालत नाही, असे आमदार वैभव नाईक म्हणाले.
आमदार राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांच्यावर द्वेशापोटी कारवाई
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या निर्णयावरून लक्ष विचलित व्हावे या हेतूने आमदार राजन साळवी आणि सूरज चव्हाण यांच्यावर द्वेशापोटी कारवाई करण्यात आली आहे. ही लढाई आता महाराष्ट्रापुरती राहिलेली नाही. ही लढाई उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीही राहिलेली नाही. ही लढाई महाराष्ट्र विरुद्ध गुजरात येथील व्यापाऱ्यांमध्ये राहिली आहे.






