सौजन्य - नवराष्ट्र टीम
मसूर : कराड रस्त्यावरच्या पुलांच्या संरक्षण कठड्यांची झालेली दुरवस्था व मोडतोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्षित करण्यात आली आहे. या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. एकंदरीत या रस्त्यावरील पूल मृत्यूचे सापळेच बनले आहेत. बांधकाम खात्याचे दुर्लक्ष एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. मोठा अनर्थ घडल्यावरच बांधकाम खाते जागे होणार आहे काॽ असा प्रश्न ग्रामस्थांसह वाहनधारकांना पडला आहे.
मसूर-कराड हा रस्ता खंडाळा-शिरोळ राज्यमार्ग क्र.१४६ आहे. हा वाहन चालकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र-४ला पर्यायी रस्ता असल्याने नियमित होणाऱ्या वाहतुकीसह प्रामुख्याने टोल नाका चुकवण्यासाठी अवजड वाहतूक या मार्गाने होत आहे. शिवाय यामार्गावर शाळा, महाविद्यालयांची संख्या मोठी असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमी मोठी वर्दळ आहे. त्यातच परिसरातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असून कारखान्याकडे ऊस वाहतुक करणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टरांची संख्याही मोठी आहे. या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड वर्दळ आहे.
कराडमधील बहुतांश पुलांचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेल्या अवस्थेत आहेत. यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यापूर्वी देखील तुटलेल्या संरक्षण कठड्यांमुळे याठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तुटलेल्या कठड्यामुळे अनेक चालकांना अंदाज येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पुलाच्या संरक्षण कठड्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.
रखडलेल्या चौपदरीकरणामुळे वाहनकोंडीत भर
बनवडी फाटा ते मसूर पर्यंतच्या रस्त्याचे रखडलेल्या चौपदरीकरण कामामुळे वाहनधारकांना वाहनकोंडीचा सामना करावा लागतो. बनवडी फाटा ते मसूर एवढाच ११ किलोमीटर अंतराचा महत्वाचा टप्पा मागे राहिला आहे. त्यामुळे रखडलेले चौपदरीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांतून केली जात आहे.
बळी गेल्यानंतर बांधकामला जाग येणार काॽ
बनवडी फाट्यापासून मसूरच्या जुन्या बसस्थानक मुख्य चौकापर्यंत मोक्याच्या ठिकाणी रमलर पट्टे बसवने देखील गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वरचेवर संरक्षण कठडे, दिशादर्शक फलक यांची पाहणी करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी मोठा अपघात झाल्याशिवाय व निष्पाप लोकांचा बळी गेल्यानंतर बांधकाम विभागाला जाग येणार काॽ असा प्रश्न वाहनधारकांनी केला आहे.
अनेक वर्षांपासून बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तुटलेल्या संरक्षण कठड्यामुळे अपघाताचे अनेक प्रसंग घडत आहेत. रात्री अपरात्री नवख्या वाहनचालकांना अंदाज येत नाही. परिणामी अपघात घडतात. मोठ्या संभाव्य अपघाताची प्रतीक्षा न बघता बांधकाम विभागाने पूलाच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती करावी.
– सुनिल चव्हाण. ग्रामस्थ कोपर्डे हवेली