संग्रहित फोटो
गडहिंग्लज : सध्या राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, याकडे लक्ष वेधत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही, अशी व्यवस्था करू असा शब्द शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्ता संवाद मेळाव्यात जयंत पाटील म्हणाले, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची काम करण्याची पद्धत साधी आहे. आमच्याकडे साधन संपत्ती मर्यादित आहे, मात्र महाराष्ट्र राज्यातील जनतेचा आशीर्वाद व शरदचंद्र पवार नावाची मोठी शक्ती आमच्याकडे आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की यशस्वी होवू. चंदगड, कागल विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच आमचे ध्येय आहे. शरदचंद्र पवार यांना दगा दिलेल्या, गद्दारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी एकसंघपणे ताकद उभे करून प्रत्येक घराघरात तुतारी चिन्ह पोहोचवावे. राज्यातील भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी महिलांसह महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक संघपणे प्रचार करावा असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महिलांनी हे सरकार बदलण्यासाठी आपली पावले पुढे टाकण्याची गरज आहे. सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सरकारचा पूर्ण कारभारच चव्हाट्यावर आला आहे. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यात स्वर्गीय आमदार बाबासाहेब कुपेकर यांनी मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणली. येथील विविध प्रश्न मार्गी लावले. जनतेमध्ये विकास कामातून त्यांनी विश्वास निर्माण केला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांची माणसं त्यांचे संघटना चंदगड विधानसभा मतदारसंघाच्य विकासाचा ध्यास घेऊन झटत आहे. त्यामुळे येथील जनतेने त्यांना साथ देऊन शरचंद्र पवार यांचे हात बळकट करावेत असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.